नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानमधील अशांत अशा बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावाद्यांनी सुमारे ५०० प्रवाशांना घेऊन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करून त्यातील शेकडो प्रवाशांचे अपहरण केले होते.दरम्यान रेल्वेतील प्रवाशांची सुटका करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न सुरू आहे. काही प्रवाशांची सुटका करण्यात यश आले आहे. अशात आता या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या (BLA) ने जाफर एक्सप्रेवरील हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ट्रेनवर बॉम्ब हल्ला करुन ट्रेन ताब्यात कशी घेतली, हे दिसत आहे.
पाकिस्तानी लष्कराने आतापर्यंत १५० हून अधिक ओलिसांची सुटका केली आहे, परंतु १०० हून अधिक ओलीस अजूनही बीएलएच्या ताब्यात आहेत. बलुच आर्मीने ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. बलुच कैद्यांची सुटका करण्याचा हा अल्टिमेटम आहे. दरम्यान, बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि बलुच बंडखोरांमध्ये चकमक सुरुच आहे. पाकिस्तानी लष्कराने २७ बलुच बंडखोरांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे, तर ४० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिकही ठार झाले आहेत.
व्हिडीओमध्ये काय आहे?
या व्हिडिओत बलुच बंडखोरांनी रेल्वे रुळांवर स्फोट घडवून आणत जाफर एक्सप्रेसला थांबण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. त्यानंतर बलुच लिबेरशन आर्मीच्या लोकांनी रेल्वेवर गोळीबार केला आणि व्हिडिओच्या शेवटी ते रेल्वेतील प्रवाशांना बाहेर काढून त्यांना ताब्यात घेत असल्याचे दिसत आहे.
जाफर एक्स्प्रेस कशी हायजॅक केली?
जाफर एक्स्प्रेस नेहमी प्रमाणे क्वेटाहून पेशावरसाठी निघाली होती. जेव्हा ट्रेन बालोन टेकड्यांमधील बोगद्यातून जात होती, तेव्हा घात लावून बसलेल्या बीएलएच्या ८ सशस्त्र दहशतवाद्यांनी ट्रेनवर हल्ला केला. जाफर एक्स्प्रेसमध्ये सुमारे ५०० प्रवासी होते. बोलन हा क्वेटा आणि सिबी दरम्यान १०० किलोमीटरहून अधिकचा डोंगराळ भाग आहे. या दरम्यान १७ रेल्वे स्थानके आहेत. येथे आव्हानात्मक भूभागामुळे गाड्या अनेकदा मंदावतात. याचाच फायदा घेत काल बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसवर हल्ला करत प्रवाशांचे अपहरण केले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा