नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज्यसभेत पुन्हा एकदा सभापती जगदीप धनखड आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्यात वाद झाल्याचे पहायला मिळाले. शुक्रवारी सभागृहात कामकाजावेळी जया बच्चन पुन्हा एकदा भडकल्या. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि खासदार जया बच्चन यांच्यात शाब्दिक द्वंद्व पाहायला मिळत आहे.
सभापती जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांचे नाव घेताना जया अमिताभ बच्चन असे घेतल्यानंतर हा वाद सुरु झाला होता. माझी स्वत:ची ओळख असताना माझ्या पतीचे नाव घेतले जाऊ नये, असे मत जया बच्चन यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात धनखड आणि जया बच्चन यांच्यात शाब्दिक चकमकी पाहायला मिळत होत्या. त्याचा पुन्हा प्रत्यय आज आला. आजच्या सत्रात जगदीप धनखड यांना राग अनावर झाला आणि त्यांनी जया बच्चन यांना अतिशय कठोर शब्दांत सुनावले.
यावेळी जया बच्चन यांनी सुरवातीला आक्षेप घेत म्हंटले, मी एक कलाकार आहे आणि मला देहबोली आणि हावभाव चांगले समजतात. मला हे सांगताना वाईट वाटतेय की तुमचा टोन स्वीकारार्ह नाही. आम्ही सहकारी आहोत. तुम्ही जरी खुर्चीवर बसला असला तरी… जया बच्चन असे बोलत असतानाच जगदीप धनखड खुर्चीवरून उठले. त्यांनी जया बच्चन यांना जागेवर बसण्यास सांगितले.
सभापतींनी सुनावले
“जया जी, तुम्ही खूप नाव कमावले आहे. सारे तुमचा आदर करतात. पण तुम्हाला माहिती असेल की अभिनेत्याला कुठली गोष्ट कशी सांगायची हे दिग्दर्शकाला योग्य माहिती असते. तुम्ही काही गोष्टी तिथे बसून पाहू शकत नाही, ज्या मी या खुर्चीत बसून पाहू शकतो. दररोज मला हे पुन्हा असा प्रकार नकोय. मी येथे पाहून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. तुम्ही माझ्या टोन बाबत बोलताय… आता बास झाले… तुम्ही भले सेलिब्रिटी असाल पण तुम्हाला सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल. मी हे सारखे सारखे सहन करणार नाही.”
सभागृहात आपले नाव जया अमिताभ बच्चन असे घेतल्याने जया बच्चन यांनी आक्षेप घेतला होता. पतीचे काम अभिमानास्पद आहे. पण पतीच्या नावामागे पत्नीचे नाव दबले गेले नाही पाहिजे असे म्हणत त्यांनी आक्षेप घेतला. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वत:च त्यांनी मी जया अमिताभ बच्चन, मला काही विचारायचे आहे असे म्हणताच सभागृहात हशा पिकला होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा