आत्मसाक्षात्काराचा एकमेव मार्ग म्हणजे कृपावर्षाव. तुमच्यामध्ये दोन महत्वाच्या प्रवृत्ती आहेत. एक म्हणजे तग धरून राहण्याची उपजत प्रवृत्ती, जी तुम्हाला सतत खाली खेचत असते. आणि दुसरी- बंधमुक्त होण्याची आस. जे काही ही आस तेवत ठेवते, तिला आपण कृपा असे म्हणतो आणि जे तुम्हाला सतत सांगत असते की हे सुरक्षित नाही, आपण सुरक्षित गोष्टीच करू ती असते तग धरून राहण्याची प्रवृत्ती.
तुमचे शरीर असू द्या किंवा हा ग्रह असू द्या किंवा आपली सूर्यमाला असू द्या किंवा अगदी संपूर्ण विश्व असू द्या, या सगळ्या भौतिक गोष्टींना नेहमीच मर्यादा आहेत. भौतिकतेच्या सीमा कायम ठरलेल्या आहेत. पण ह्या भौतिकतेला जे एकत्र धरून ठेवते ती मात्र असते सीमारहित, अस्तित्वशून्य, पोकळी. ती म्हणजे सृजनशीलता.
ती सीमारहित पोकळी म्हणजेच ‘जे नाही आहे ते’- म्हणजेच ‘शिव’. आपण जेव्हा ‘शिव’ म्हणतो, तेव्हा आपण, जे तुम्हाला सतत ह्या पोकळीत खेचत असते, त्या पैलूविषयी बोलत असतो. ज्याला अस्तित्व टिकवून धरायचे आहे, तो तुमच्यातील पैलूदेखील कार्यरत असतो पण तुमचे अस्तित्व काही ठराविक काळापुरते मर्यादित असते. मग ते तुम्ही असा किंवा हा ग्रह असू द्या किंवा आपली सूर्यमाला असू द्या किंवा संपूर्ण आकाशगंगा असू द्या, काहीही असले तरी त्याचे अस्तित्व मर्यादित काळापुरते असते. सर्व काही त्या कृपावर्षावातून उगम पावते आणि परत त्याच कृपेत विलीन होते. म्हणूनच तुम्ही ज्याला शून्यता म्हणता ती म्हणजे कृपाच आहे. तुम्ही ज्याला शिव म्हणता ती सुद्धा कृपाच आहे.
तुम्ही त्याला कसा स्पर्श कराल? ह्या ब्रम्हांडात तुम्ही किती सूक्ष्म आहात याची तुम्हाला जाणीव व्हायला हवी. तुम्ही या विश्वाचा अतिसूक्ष्म घटक आहात. तुम्ही मोठे असल्याचे ढोंग करता आहात. तुम्ही जर हे ढोंग करणे थांबवले तर तुम्ही कृपेप्रती ग्रहणशील होऊ शकता. एक सोपा उपाय म्हणजे कशाहीबद्दल किंवा कोणाहीबद्दल कोणताही निष्कर्ष काढू नका किंवा भेदभाव करू नका.
येशू ख्रिस्त म्हणाला की, जर तुम्हाला एकच डोळा असेल तर तुमचे सगळे शरीर प्रकाशमय होईल. दोन डोळे असल्याने भेदभाव उत्पन्न होतो. ते तुम्हाला उच्च-नीच सांगतात. कोण पुरुष आहे आणि कोण स्त्री आहे ते सांगतात. हे काय आहे आणि ते काय आहे हे सांगतात. दोन डोळे हे अस्तित्व टिकून राहण्याकरता असलेली साधने आहेत. तुम्हाला एक डोळा असणे म्हणजे दुसरा डोळा बंद करणे नव्हे. त्याचा अर्थ तुम्ही आता भेदभाव करत नाही.
तुम्ही सर्वकाही एक समान, एक आहे असे पाहता. तुम्ही जर तसे झालात, तर तुमचे शरीर प्रकाशमय होईल – म्हणजेच कृपामय होईल. कृपा म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा स्त्रोत, जो सृष्टीपेक्षाही मोठा आहे आणि तो आता काही तुमच्या शरीराबाहेर नसून तुमच्या शरीराच्या आतच आहे. तुम्ही प्रकाशाचा बाह्य स्त्रोत शोधत नसून, तुम्ही स्वतःच तो स्त्रोत झाला आहात. तुम्ही क्षणभरासाठी जरी तो स्त्रोत झालात तरी तुमचे आयुष्य कायमचे बदलून जाईल.