अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील महाजन गल्ली येथील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा केवळ आठ तासांत उघडकीस आणून कोतवाली पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, न्यायालयाने त्यांना 12 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुरज उर्फ सोमनाथ राजू केदारे (वय 21 रा. बोल्हेगाव) व मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे (वय 20 रा. वैष्णवनगर, केडगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मंगळवारी (8 एप्रिल) रात्री 10.45 ते बुधवारी (9 एप्रिल) पहाटे 5.30 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी महाजन गल्लीतील जैन मंदिराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यांनी मंदिरातील दानपेट्यांमधून 70 हजार रूपयांची रोकड व पद्मावती मातेच्या मूर्तीच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरले. या प्रकरणी मंदिर समितीचे अध्यक्ष महावीर झुंबरलाल बडजाते यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर मानून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाच्या महिला पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले यांच्याकडे देण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार संशयित दोघे आरोपी भिमा कोरेगाव, पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तेथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान संशयित आरोपींनी आणखी दोन गुन्ह्यांची कबूली दिली असून त्या गुन्ह्यातील मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे, उपनिरीक्षक गणेश देशमुख, अंमलदार दरंदले, विशाल दळवी, संदीप पितळे, सलीम शेख, दीपक रोहकले, तानाजी पवार आदींच्या पथकाने सदरची कामगिरी केली.