पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुका दौर्यावर आलेल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जलजीवन योजनेत तक्रारी असणार्या तालुक्यातील आल्हानवाडीसह अन्य गावांकडे गुरूवारी पाठ फिरवली. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक तक्रारी असणार्या गावांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांना नेले नसल्याची चर्चा पंचायत समितीच्या गोटात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर गुरुवारी पाथर्डी तालुक्याच्या दौर्यावर होते. यावेळी त्यांनी अंगणवाडी, शाळा व जलजीवन योजने अंतर्गत पाणी योजनांच्या कामांची पाहणी केली. दरम्यान, जलजीवन योजनेत तक्रारी झालेल्या आल्हनवाडीसह इतर गावाकडे त्यांनी पाठ फिरवली. स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक तक्रारी असलेल्या गावाकडे येरेकर यांना नेले नसल्याची चर्चा पंचायत समिती गोटात सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचा कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्याच्या मिशन शंभर दिवस अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर गुरुवारी तालुका दौर्यावर होते.तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. अनेक गावांमध्ये जलजीवन योजनेच्या अपहाराबाबत तक्रारी आहेत.आल्हनवाडी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अपूर्ण असताना स्थानिक प्रशासनाने जलजीवन योजनेचे सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचे काम हाती घेतले आहे. आल्हनवाडीने यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. सध्या आल्हनवाडी अपहारप्रकरण गाजत असतानाच येरेकर यांचा पाहणी दौरा स्थानिक प्रशासनाची धडकी वाढवणारा ठरला. मात्र येरेकर यांनी दौर्यात तक्रारदार गावाकडे फिरवलेली पाठ चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक प्रशासनाने येरेकर यांना चुकीची माहिती देत तक्रारी झालेल्या कामापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याची चर्चा पंचायत समिती वर्तुळात होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर गुरूवारी नगरहून तिसगाव येथे आले. तेथे त्यांनी इंदिरानगर वस्तीवरील अंगणवाडी व शाळा तपासणी केली. अंगणवाडी येथे वीज पुरवठा नसल्याचे पाहून त्यांनी तात्काळ वीजपुरवठा जोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकांने मिशन आरंभ योजनेची अंमलबजावणी न केल्याने संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी मढी मार्गे धामणगाव येथील जलजीवन योजनेच्या कामाची पाहणी केली. कामाला गती देऊन तात्काळ योजना कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. पाथर्डी शहरातील व साकेगाव येथील पंपिंग स्टेशन कामाची पाहणी करत अधिकार्यांना सूचना दिल्या. दौर्यादरम्यान त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपाभियंता अनिल सानप, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार व विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शंभर दिवस मिशन अंतर्गत मुख्यकार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांचा दौरा होता. शाळा, अंगणवाडी व जलजीवन मिशन योजनेच्या कामांची त्यांनी पाहणी केली. जलजीवनच्या कोणत्या कामाला भेटी द्यायच्या याचे वरिष्ठ पातळीवरून नियोजन करण्यात आले होते.
– शिवाजी कांबळे, गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी.