श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पुरुष, महिला व लहान मुले सहभागी असताना त्यांच्यावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा तसेच गोळीबाराचा श्रीरामपुरात सकल मराठा समाजाने जाहीर निषेध करत आंदोलन केले. या निषेधार्थ आज रविवार दि.3 सप्टेंबर रोजी श्रीरामपूर शहर व तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.
याबाबत सकल मराठा समाजाच्यावतीने प्रांताधिकारी व तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शांततेच्या मार्गाने अंतरवली येथे मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना अचानक 2 हजार पोलीस फोर्स पूर्वनियोजित आंदोलकांवर लाठी हल्ला केला. महिलांना मारहाण केली. लहान मुलांना बंदुकीच्या छर्याने जखमी केले. 120 पेक्षा जास्त आंदोलकांना ऍडमिट होईपर्यंत मारले. त्यामुळे या हल्ल्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषीवर कारवाई करावी. तसेच सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट करा किंवा जालना घटनेची जबादारी घेऊन आपण तिघाडी सरकार बरखास्त करा, अशी मागणी करण्यात आली.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल शनिवारी श्रीरामपूर आगाराने एसटी बसेस बंद केल्या होत्या. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातून शाळा, कॉलेजमध्ये आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींची घरी जाण्याची गैरसोय झाली होती. म्हणून सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आगारात जाऊन बसेस सुरू ठेवण्याची विनंती केली. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव बस सुरू करण्यास आगार प्रमुख कुटे यांनी असमर्थता दाखवली.त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना पाचारण केले. त्यांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बसेस सोडण्यात आल्या.