Tuesday, January 27, 2026
Homeमहाराष्ट्रJalgaon News : धक्कादायक! माथेफिरूने दोन शाळकरी मुलींना विहिरीत ढकलले; दोघींचाही मृत्यू

Jalgaon News : धक्कादायक! माथेफिरूने दोन शाळकरी मुलींना विहिरीत ढकलले; दोघींचाही मृत्यू

जळगाव । Jalgoan

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. साकरी गावाजवळ एका माथेफिरूने इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून दिल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून जनमानसात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, साकरी गावातील या दोन्ही मुली नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडल्या होत्या. त्या दोघी गावातीलच एका खासगी शिकवणीला (ट्यूशन) जात होत्या. मात्र, त्यांच्यावर काळाने झडप घातली. गावाबाहेरील एका शेतात रोहन चौधरी नावाचा तरुण दबा धरून बसला होता. या मुली रस्त्याने जात असताना त्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. काहीही समजण्याच्या आत त्याने दोन्ही मुलींना बळजबरीने ओढत नेऊन जवळच असलेल्या एका खोल विहिरीत ढकलून दिले.

YouTube video player

मुलींना विहिरीत ढकलल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलींनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून शेतात काम करणारे मजूर आणि जवळून जाणारे ग्रामस्थ तातडीने विहिरीकडे धावले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी साकरी गावात पसरली आणि काही वेळातच विहिरीवर मोठी गर्दी जमली. ग्रामस्थांनी दोरखंडाच्या मदतीने विहिरीत उतरून मुलींना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने आणि मुलींना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. काही वेळाने दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. आपल्या लाडक्या मुलींचे निष्प्राण देह पाहून पालकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी तत्काळ साकरी गावात धाव घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी संशयित आरोपी रोहन चौधरी याला शोधून काढून ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात आरोपी हा माथेफिरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याने इतक्या लहान मुलींच्या बाबतीत असे टोकाचे आणि क्रूर पाऊल का उचलले? याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही.

या घटनेमुळे साकरी गावासह भुसावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलींसोबत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये सुरक्षिततेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

Crime News : लग्नात ५० तोळे सोनं, गाडी घेण्यासाठी २५ लाख...

0
पुणे | Pune पुणे जिल्ह्यातील (Pune District) उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.दीप्ती मगर-चौधरी (Deepti...