जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालयात बुधवारी कोरोना संशयित म्हणून १५ व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते. त्यातील १४ संशययित रुग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ते अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात तीन ते पाच महिन्याच्या दोन बाळांचा देखील समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
या रुग्णालयात गुरुवारी दुपारी १ वाजेपर्यंत कोरोनाचे नवीन संशयित पाच रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रुग्णालयामार्फत पाठवण्यात आलेल्या कोरोनाच्या संशयित २२ रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. रुग्णालयात दाखल संशयित दोन बाळांना निमोनिया व श्वसनाचा विकार आहे. तर मेहरुण परिसरातील दाखल पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती कोरोना नियंत्रण कक्षाचे समन्वयक डॉ.विलास मालकर यांनी दिली.