शिक्षणाधिकार्यांच्या बनावट सहीने शिक्षक, शिपाई नियुक्ती
जळगाव –
माध्यमिक शिक्षणाधिकार्यांच्या सहीचे बनावट आदेश तयार करुन शिक्षक व शिपाई पदाची भरती केल्याप्रकरणी पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ, तसेच धनदाई माता एज्युकेशन सोसायटी मोहाडी (प्र.डांगरी), धुळे संस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा (वॉर्ड क्र. 6) या शाळेत शासन निर्णयानुसार आठ पदे मंजूर होती. ही आठ पदे कार्यरत असताना संस्थेने मयूर किशोर महाजन, मिलिंद माधव सावळे, संगीता मनोहर सोनवणे, संदीप दिनकर पाटील, वैशाली पुरणदास राठोड यांची उपशिक्षक, तर नितीन मीठाराम सोनवणे व निखील विकास नाईक यांची शिपाई म्हणून नियुक्ती केली.
या नियुक्त्या करताना संस्थाध्यक्ष, सचिव, संचालक व मुख्याध्यापकांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची बनावट सही करुन 17 नोव्हेंबर 2017 रोजीचे नियुक्ती आदेश काढले. नंतर ही प्रकरणे शिक्षणाधिकार्यांमार्फत उपसंचालक (नाशिक) येथे न पाठविता शालार्थ आयडी म्हणून हे प्रकरण मंजूर करुन घेतले.
तर धनदाई एज्युकेशन सोसायटी मोहाडी (प्र.डांगरी), ता. धुळे संचलित जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथे मंजूर पदे रिक्त नसताना रोहिदास प्रताप ठाकरे, प्रदीप लीलाधर धनगर, भाग्यश्री रामदास वानखेडे व दत्तू भगवान कोळी यांची शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती केली. येथेही संस्थेचे दत्तात्रय दयाराम पाटील, वसंत तानकू पाटील, संचालक व मुख्याध्यापकांनी बनावट आदेश तयार करुन या नियुक्त्या करुन शासन व उमेदवारांची फसवणूक केली आहे.