Saturday, May 4, 2024
Homeजळगावगुन्हेगारीतील वर्चस्वाच्या वादातून तरूणाचा खून

गुन्हेगारीतील वर्चस्वाच्या वादातून तरूणाचा खून

जळगाव – Jalgaon :

गुन्हेगारीत वर्चस्वावरून असलेल्या जुन्या वादातून सराईत गुन्हेगार बापू संतोष राजपूत (वय ४४, रा. खोटेनगर ) याचा गेम करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगार महेश वासुदेव पाटील उर्फ डेम्या (वय २१, रा. हिराशिवा कॉलनी, खोटेनगर) याचाच बापु राजपुतने खुन केल्याची घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास खोटेनगरातील पाण्याच्या टाकीजवळ घडली.

- Advertisement -

दरम्यान बापू राजपूत हा खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असून पॅरोलवर बाहेर आला होता. त्यातच त्याच्याकडून पुन्हा खून झाला आहे. तर मयत डेम्या हा सुद्धा सराईत गुन्हेगार असून त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेत बापू जखमी झाला असुन त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डेम्या व त्याचे दोन मित्र शनिवारी रात्री खोटेनगरातील पाण्याच्या टाकीखाली दारु पित बसलेले होते. याठिकाणी बापू राजपूत देखील तेथे आला. दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी एकमेकांवर चॉपरने हल्ला चढवला. यात डेम्याने बापूवर वार केला.

तो वार त्याने उजव्या हातावर झेलला. व प्रतिकार म्हणुन डेम्याच्या पोट, छाती व हनुवटीवर चॉपरने वार केले. आहेत. हल्ला झाल्यानंतर डेम्याने घटनास्थळावरुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्य रस्त्यावर येण्याआधीच त्याला पुन्हा गाठुन बापूने वार केले. यात जागीच त्याचा मृत्यू झाला.

ही घटना कळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाण्याच्या टाकी खाली दोन मद्याच्या व दोन पाण्याच्या बाटल्या, वेफरचे पाकीट व दोन चॉकलेट आढळुन आले.

घटनास्थळासह मृतदेहाचा पंचनामा पोलिसांनी केला. रात्री ११.३० वाजता डेम्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. तत्पूर्वी जखमी बापू हा देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हद्दपारी पुर्वीच जीवनातुन हद्दपार

मृत डेम्या याच्यावर यापूर्वी हाणामारी, जबरीलुट, खुनाचा प्रयत्नांसारखे तालुका पोलिस ठाण्यात नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपार करावे असा प्रस्ताव तालुका पोलिसांनी तयार केला आहे. तसेच २५ जून रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवत असताना पोलिसांनी त्याला अटक केली होती. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर लागलीच त्याचा खून झाला. ज्या गुन्ह्यांमुळे हद्दपारीची कारवाई होणार होती त्याच गुन्हेगारीमुळे डेम्याला जीवनातून हद्दपार होण्याची वेळ आली.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

डेम्या व बापू दोघे एकाच भागात राहतात. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोघांचे कुटंुुबीय घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा झाल्यानंतरही डेम्याचा मृतदेह घटनास्थळावरुन हलवण्यास डेम्याच्या कुटंुबीयांनी नकार दिला होता.

पोलिस अधिक्षकांना बोलवण्याची मागणी त्यांनी केली होती. तालुका पोलिसांनी समजुत काढल्यानंतर त्यांनी मृतदेह घटनास्थळावरुन रुग्णालयात हलवण्यास मंजुरी दिली.

मृत डेम्या याच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील रिक्षाचालक असल्याची माहिती समोर अाली आहे.

जिल्हा रुग्णालयातही भिडले तरुण

घटनेनंतर डेम्याचे काही मित्र घटनास्थळी व नंतर रुग्णालयात दाखल झाले होते. उपचार घेत असलेला बापू देखील रुग्णालयातच होता. यावेळी मयत डेम्याचे काही मित्र जिल्हा रुग्णालयात आले. याठिकाणी बापू व डेम्याकडील मुलांमध्ये हाणामारी झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

रुग्णालयात पोलिस पोहोचतात दोन्ही गटांकडील तरुण फरार झाले. दरम्यान घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात दोन्ही ठीकाणी तणाव निर्माण झाला होता. सहाय्यक पोलिस अधिक्षक वाघचौरे यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या