Monday, May 27, 2024
Homeजळगावडिजिटल युगात नाणी, नोटाही कालबाह्य होणार ; लेखक, आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले...

डिजिटल युगात नाणी, नोटाही कालबाह्य होणार ; लेखक, आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांची ‘देशदूत’शी बातचीत

प्रगत तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदलणार जग

जळगाव । प्रतिनिधी

- Advertisement -

प्रगत तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलतेय. डिजिटल युगात वाढत्या ऑनलाइन व्यवहारांमुळे काही वर्षांनी नाणी, नोटा, क्रेडीट, डेबीट कार्डही कालबाह्य होऊन नवनवीन संकल्पना येतील. या बदलाच्या ओघात काळानुरुप बदल स्वीकारुन ते अमलात आणले तरच आपण टिकू शकतो, असे परखड मत नामवंत लेखक, आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.

गोडबोले कार्यक्रमानिमित्त रविवारी जळगावात आले होते. अजिंठा  विश्रामगृहात त्यांनी ‘देशदूत’ शी दिलखुलास संवाद साधला. त्यांनी काही वर्षांपूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून खान्देशात आदिवासी चळवळीत काम केलेले आहे. या चळवळीसह खान्देशातील काही स्थळांचा उल्लेखही त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये आहे. त्या काळातील मंतरलेल्या दिवसातील आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. तर चोपड्याहून येताना गरम पाण्याच्या झर्‍यांसाठी प्रसिद्ध असलेल्या उनपदेव या स्थळाला आवर्जून जाऊन आल्याचे सांगितले. या परिसरात आदिवासी चळवळीत कार्य केल्याचा अनुभव सांगितला. अजूनही तसे मस्त, भडंग जीवन जगायची तयारी असल्याचेही  त्यांनी नमूद केले.

आता ‘माय लॉर्ड’चे लेखन

गोडबोले यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांचे लेखनही अष्टपैलू, विविध क्षेत्रातील बर्‍याच विषयांशी संबधित आहे. त्यांची अनेक पुस्तके, कारकिर्द जगप्रसिद्ध आह. ज्या 50 पुस्तकं, ग्रंथानी जग बदलले, त्या पुस्तकातील ज्ञानातून सर्व समावेशक अशा ‘माय लॉर्ड’ या नवीन एका पुस्तकाचे लेखन सुरू आहे. ते पुस्तक एखाद्या धर्म ग्रंथाप्रमाणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. तर  विविध क्षेत्रांप्रमाणे आता ‘तत्त्वज्ञान’ या विषयावरही लेखनासाठी लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांवर कार्पोरेटचा प्रभाव

प्रगत राष्ट्र व भारतामधील माध्यमांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, दोघंही ठिकाणच्या माध्यम जगावर आता कार्पोरेटचा प्रभाव वाढला आहे. अमेरिकेसारख्या देशात आपले काही चुकले तर, तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सारखी व्यक्ती पत्रकार परिषद घेवून थेट चुकांबाबत सांगतात. पण आपल्याकडे तसे होत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. डिजिटल युग, ऑनलाइनमुळे प्रींट मीडियाचे भवितव्य धोक्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारितेत येणार्‍या नवीन पत्रकारांना अनेक विषयांचे प्राथमिक ज्ञानही नसते. अनेक टीव्ही चॅनल्सवर प्रवास, स्वयंपाक, सिनेमा, फॅशन अशा कार्यक्रमांवर 80 टक्के भर असतो. पण, लोकोपयोगी विषयांवर सर्वांगिण फारसी सखोल चर्चा होत नाही. ‘सिरियस जर्नालिझम’कमी होत असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

‘जॉब वर्क’ बदलणार

डिजिटल युगामुळे कामकाजाचे स्वरुप बदलेले. अद्ययावत तंत्रज्ञान, साधन, सुविधांमुळे अनेक  कार्यालयातील काम घरबसल्या करता येतील. व्हीडिओ कॉन्स्फरन्स, ऑनलाइनमुळे कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. शाळा, महाविद्यालयातील शिक्षणाच्या पद्धतीतही आमुलाग्र बदल होतील. शाळा, कार्यालये, लायब्ररी ‘म्युझियम’ होतील. रोबोच्या सहाय्याने लेखन वाढेल. ऑनलाइन व्यवहारांमुळे दुकाने, ट्रॅव्हल्स एजन्सीचे कार्यालये बंद होतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले.

सांगकाम्याची मानसिकता

तसेच भारतातील सॉफ्टवेअर इंजिनिअर जगभरात प्रसिद्ध आहेत. परंतु, गुगल, मायक्रोसॉफ्ट सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट नाही की, ते जगावर राज्य करू शकेल, यासंदर्भात गोडबोले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, भारतीय मानसिकता सांगकाम्याची आहे. त्यांच्यात क्षमता असूनही ते जोखीम पत्करायला तयार नसल्याचे अच्युत गोडबोले म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या