‘देशदूत’ लाईव्ह संवाद कट्ट्यावर उमटला सूर
सहभाग : माजी उपमहापौर करीम सालार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले, भाजप महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते अशपाक पिंजारी, संविधान बचाव चळवळीचे मुकुंद सपकाळे
जळगाव –
धर्माच्या नावावर देशात किती दिवस राजकारण करणार आहात, आता हे मुद्दे संपवून देशाच्या एकता व अखंडतेसाठी राजकारण झाले पाहिजे, असा सुर शुक्रवारी ‘देशदूत लाईव्ह संवाद कट्ट्या’वर उमटला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लखनऊ येथील सभेत केलेल्या वक्तव्याचा अन्वयार्थ या विषयावर देशदूत संवाद कट्ट्यावर चर्चा करण्यासाठी माजी उपमहापौर करीम सालार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले, भाजप महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते अशपाक पिंजारी, संविधान बचाव चळवळीचे मुकुंद सपकाळे सहभागी झाले होते. सर्व सहभागींचे कार्यकारी संपादक अनिल पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी दिपक सूर्यवंशी म्हणाले की, शरद पवारांनी नेहमीच शाहू फुलेंच्या नावाने राजकारण केले आहे. पवार शेतीचा मुद्दा सोडून जाती-पातीच्या राजकारणात गुंतले आहेत. राज्याच्या व देशाच्या राजकारणाला पवार नेहमीच वेगळे वळण देतात, असेही ते म्हणाले.
करीम सालार म्हणाले की, अयोध्येत मंदिरासाठी ट्रस्ट सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने बनत आहे. त्या जागेवरूनच मुस्लिम मंडळात मतभिन्नता आहे. मशिदीसाठी जागा कुठे घ्यायची? हे सुन्नी वक्फ बोर्ड ठरवेल. कोणतेही शासन एखाद्या धर्माचे किंवा समाजाचे नसते. मंदिर किंवा मशिद अशी एक जागा असते कि त्या ठिकाणी माणूस नतमस्तक होण्यासाठी जात असतो.
त्यामुळे धार्मिक स्थळांचे जागांचे असे वाद दुर्देवी आहेत. मात्र शरद पवारांनी मशिदीचा ट्रस्ट करण्याबाबत जे वक्तव्य केले आहे. त्याचा शासनाने गांभीर्याने विचार करणेही गरजेचे आहे. सद्या भारतात जे काही सुरू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. देशाचे पंतप्रधान हे आमचेही नेते आहेत. मात्र भारताचे जगभरात विविध कारणांवरून हसू होते आहे. एन.आर.सी.ला आम्ही घाबरत नाहीत मात्र ढेपाळलेल्या या यंत्रणेत नागरिकत्वाचे पुरावे देणारे कागदपत्रे कोठुन आणणार? जे मुद्दे आपल्यासमोर आ वासून उभे आहेत त्यावर सुध्दा काम होणे गरजेचे आहे. पवारांचे वक्तव्य म्हणजे देशात धार्मिकतेची बीजे पेरू नका, असे सांगणारा शासनाला इशारा आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुकुंद सपकाळे म्हणाले की, राम मंदिरासारख्या ट्रस्टमध्ये धर्मांध गुन्हेगारांचा समावेश असणे हे धार्मिक धु्रवीकरणाचे लक्षण आहे. शरद पवारांनी घेतलेली भुमिका अतिशय योग्य असून एखाद्या विशिष्ट वर्गाला न्याय व दुसर्यांवर अन्याय ही बाब ठिक नसल्याचेही ते म्हणाले. देशात असलेल्या महागाई, मंदी या सारख्या बाबींवरून लक्ष हटविण्यासाठी असे धार्मिक मुद्दे पुढे आणली जात आहेत. लोक कल्याणकारी योजना राबविण्यात केंद्र शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे शरद पवारांचे वक्तव्य हे सामाजिक न्यायाच्या भुमिकेतून केलेल वक्तव्य आहे.
योगेश देसले म्हणाले की, शरद पवार कोणतेही वक्तव्य विचारपूर्वक करीत असतात. मंदिरासाठी ट्रस्ट मग मशिदीसाठी का नको? हा सवाल योग्यच आहे. पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे हिंदुत्व वाद लादू पाहणार्यांच्या पोटात पोटशुळ उठला आहे. शाहू-फुलेंच्या वारसा पवार समर्थपणे चालवितात. पवारांच्या रक्तात शेती आहे. आणि शेतकरी हा त्यांचा प्राण आहे. पवारांनी राजकिय खेळी करीत महाराष्ट्रात जे केले ते देशाला दिशा दाखविणारे आहे.
लोककल्याणकारी राज्य स्थापन करायचे असेल तर सर्वांना सोबत घ्यावेच लागेल. पवारांच्या वक्तव्याच्या विपर्यास करण्यापेक्षा आक्रमकपणे विरोध असलेल्या एन.आर.सी.सारख्या मुद्याकडे गांभीर्याने का बघितले जात नाही. यामुळेच दिल्लीत केजरीवालांना एकतर्फी यश मिळाले आहे. केजरीवालांचा हा दिल्ली पॅटर्न आता देशभर जाणार आहे.
कार्यकारी संपादक अनिल पाटील यांनी यावेळी मेराज फैजाबादी यांच्या शेरमधील संदर्भ येथे दिला. ‘काश कबीलेमे क्या हुआ यह किसीको फिक्र नही सब तो इस ख्वाबपर लढ रहे है के, कबीले का सरदार कौन होंगा’अशपाक पिंजारी म्हणाले की, पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. पवारांनी राज्यघटनेला अनुसरून आपली भुमिका मांडली आहे. संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे. शेकडो वर्षापासूनचे रोटी-कपडा-मकान हे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. भाजपाने फक्त हिंदू-मुस्लिम वादाचेच चित्र देशात उभे केले आहे. त्यामुळे देशात अराजकता पसरत आहे. राज्यकर्ते म्हणून विश्वास मिळविण्यात भाजपा सरकार कमी पडले आहे. त्यामुळे आता धर्माच्या नावावर राजकारण न करता मानवता एकात्मता व अखंडतेसाठी राजकारण झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान चर्चेचा समारोप ‘दुश्मनी जमकर करो लेकीन ये गुन्जाईश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो पाए’ या डॉ.बशिर बद्र यांच्या कवितेतील चार ओळींनी करीम सालार यांनी समारोप केला.