जळगाव | प्रतिनिधी
स्वत:च्या मालमत्ता विकणार नाही असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करण्याच्या अटीवर घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या राजा मयूर, नाना वाणी यांना मुंबई खंडपीठाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.
घरकुल घोटाळ्यात आरोपी असलेल्या राजा मयूर, नाना वाणी यांना धुळे विशेष न्यायालयाने ५० कोटी रुपये दंड आणि ७ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान या प्रकरणात आरोपींनी जामिनासाठी मुंबई खंडपीठात धाव घेतली होती.
या प्रकरणात या आधीच मुख्य आरोपी सुरेश जैन यांना उपचारासाठी खंडपीठाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी मुंबई खंडपीठात न्यायमूर्ती रणजीत मोरे व तावडे यांचेसमोर घेण्यात आलेल्या सुनावणीत या दोन्ही आरोपींना जामिनावर असताना आपल्या कोणत्याही मालमत्ता विकत येणार नाहीत या अटीवर जमीन मंजूर केला.
दरम्यान एका आठवड्याच्या आत या दोघांनीही मालमता न विकण्याची हमी देणारे प्रतिज्ञापत्र खंडपीठात सादर करायचे आहे. अशी अट देखील खंडपीठाने घातली आहे.या प्रकरणी आरोपीकडून एड.पी.एम. शहा, ॲड.फोंडा यांनी काम पहिले तर सरकारकडून विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी काम पहिले. आता घरकुल घोटाळ्यातील सर्वच आरोपींना न्यायालयातून जामीन मिळाले आहेत.