Sunday, November 24, 2024
Homeजळगावगद्दारीचा डाग कायमरुपी धुतला, स्थानिक मुद्देही ठरले निष्प्रभ

गद्दारीचा डाग कायमरुपी धुतला, स्थानिक मुद्देही ठरले निष्प्रभ

महायुतीचे एकदिलाने काम
ग्रामीणमध्ये गुलाबभाऊच लाडके
अनिल पाटीलच ठरले ‘भूमिपुत्र’
जळगावात पुन्हा सोज्वळ चेहरा
जामनेरकरांचा धोक्याचा इशारा
चंद्रकांत पाटील ‘जायण्ट किलर’
किशोरआप्पांना मतविभाजनाने तारले
रावेरमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती
भुसावळला हंगामी नेते नाकारले
एरंडोलला यंदा एरंडोली नाही
मंगेश चव्हाण ठरले हेविवेट
चोपड्यात पुन्हा सोनवणेच

विधानसभेच्या सर्व 11 जागा दणक्यात जिंकून जळगाव हा युतीचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विशेष म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी फुटीनंतर विरोधकांनी फोडलेला टाहो आणि लावलेला गद्दारीचा डाग देखील मतदारांनी कायमस्वरुपी धुऊन टाकला आहे. या निवडणुकीत कोणतेही स्थानिक मुद्दे चालले नाहीत. महायुतीच्या योजना, खास करून लाडकी बहीण, निवडणुकीत युतीने एकदिलाने केलेले प्रामाणिक काम, संघाने बजावलेली चोख भूमिका या बाबी युतीच्या देदीप्यमान यशाला कारणीभूत ठरले.

- Advertisement -


2009 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता गेल्या तीन दशकापासून जळगाव जिल्हा युतीच्याच मागे राहिला आहे. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच, भाजपाचे चार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी एक असे बलाबल होते. दोन वर्षातच एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात जिल्यातील शिवसेनेच्या सर्व पाचही आमदारांनी सहभाग घेतला. या पाचही आमदारांवर गद्दारीचा डाग लागला. अगदी अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हा मुद्दा चर्चेत होता. राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही अजितदादा सोबत जाणे पसंत केले. मात्र शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांना गद्दारीच्या आरोपाने कमी छळले. विधानसभेच्या निकालातून मतदारांनी गद्दारीचा मुद्दा कायमचा निकालात काढला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली. लाडकी बहीण योजना हा तर मास्टरस्ट्रोक ठरला. या योजनेचे काही हप्ते खात्यात जमाही झाले. लाडकी बहीण योजनेवर सुरुवातीला टीका करणार्‍या महाविकास आघाडीला निवडणुकीच्या मध्यात लाडक्या बहिणींसाठी 3000 चे आश्वासन द्यावे लागले. मात्र महायुतीने प्रत्यक्षात दिले आणि आघाडी भविष्यात देणार यात आश्वासनापेक्षा प्रत्यक्ष कृती प्रभावी ठरली. मतदानातही लाडक्या बहिणींचा उत्साह लक्ष्यवेधी होता, तितकेच निकालात देखील त्याचे प्रत्यंतर आले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अनेक स्थानिक मुद्दे चर्चेत आणले मात्र मतदारांनी ते झिडकारल्याचे दिसून आले. दोन दोन पक्ष फोडले याचा भाजपावर राग असल्याचा कयास देखील सपशेल फोल ठरला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत महाविकास आघाडी चाचपडतच होती. त्या तुलनेत महायुती मात्र आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे गेली. महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक दिलाने कामाला लागले. पाडापाडीच्या उद्योगांना फूस दिली नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाला पूर्ण ताकद देते मात्र विधानसभेत भाजपा त्याची परतफेड करत नाही किंबहुना बंडखोरांच्या आड राजकारण केले जाते हा अनुभव या निवडणुकीत अजिबात दिसला नाही. संघाने देखील चोख कामगिरी बजावत सूक्ष्म नियोजन केले. निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले. पवारांनंतर राष्ट्रवादीचे भवितव्य काय याचा विचार मतदारांनी मतदान करतांना केलेला दिसतो. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे आमदार निवडून दिल्यास ते दगा फटका करणार नाही याची शाश्वती मतदारांना वाटली नाही. त्यामुळे भाजपा आणि शिंदे शिवसेना यांनाच पसंती दिली गेली. मतदारांनी कुठेतरी राजकीय स्थैर्याचाही विचार केलेला दिसतो. जातीपातीच्या राजकारणापेक्षा धर्माचा मुद्दा अधिक प्रभावी ठरलेला दिसतो.


जळगाव शहरात मतदारांनी सुरक्षित वातावरणाला पसंती दिली. उमेदवार चांगला असला तरी त्याच्या जवळच्यांची उठबस कुठे, कुणासोबत आहे हे पाहिले गेले. केवळ वैयक्तिक संपर्क, कोणाच्याही कामात धावून जाणे, व्यापारी वर्ग असेल, अन्य लहान घटक असतील राजू मामांनी एका पैशाने देखील कुणाला त्रास दिला नाही. मंत्रिपदाचा दावेदार नको म्हणून काही ‘मोठ्यां’चा दिसत असलेला छुपा विरोध झूगारून राजूमामांनी आपल्या प्रतिमेच्या बळावर दणदणीत विजय संपादन केला.


मुक्ताईनगर मधून चंद्रकांत पाटलांनी रोहिणी खडसेंचा केलेला पराभव जिल्ह्याची राजकीय दिशा बदलविणारा आहे. या निकालामुळे आता एकनाथराव खडसेंचा राजकीय सूर्यास्त जवळ आल्याचे अधोरेखित झाले आहे. गेल्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांचा विजय सोपा केला होता. आता त्याच चंद्रकांत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीला चितपट केले आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्याकडे फार मोठा थिंकटँक दिसत नाही पण जिवाभावाच्या साथीदारांच्या मदतीने आणि केलेल्या विकासकामांमुळे ते ‘जायंट किलर’ ठरले.


जामनेर मध्ये जातीचा मुद्दा प्रभावी ठरला. संपूर्ण जिल्ह्यात गिरीश महाजनांचे मताधिक्य सर्वात कमी आहे. महाजनांनी हा धोक्याचा इशारा ओळखला पाहिजे. गिरीश महाजनांचे एकीकाळाचे शिलेदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सरांना शरद पवारांनी ताकद दिली. मराठा मुद्दा जामनेर मध्ये प्रचंड चर्चिला गेला. महाजन पडतील इथपर्यंत ही चर्चा गेली. मात्र असे नकारात्मक वातावरण असतानाही गिरीश महाजन रिलॅक्स होते. मतदारसंघात प्रचारासाठी त्यांनी फारसा वेळही दिला नाही. संकटमोचक संकटात असताना जामनेरकरांनी मात्र त्यांची साथ सोडली नाही. कमी मताधिक्य देऊन महाजनांना तर खोडपे यांचा पराभव करुन मराठा कार्डला देखील जमनेरकरांनी इशारा दिलेला दिसतो.
रावेर आणि एरंडोलला विद्यमान आमदारांनी त्यांच्या सुपुत्रांना पुढे केले. जिल्ह्यात मृत्यूशय्येवर असलेल्या काँग्रेसकडे एकमेव रावेरची जागा होती ती देखील आता गमवावी लागली आहे. मतविभाजनाचा मोठा फटका रावेरमध्ये काँग्रेसला बसला. माजी आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांनी लिलया बाजी मारली. यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती झाली. स्व. हरिभाऊंनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढली आणि ते विजयी झाले होते. शिरीष चौधरी यांना पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते. आताही अमोल जावळे पहिल्याच प्रयत्नात निवडून आले, तर धनंजय चौधरींना अपयशाचा सामना करावा लागला.


एरंडोल मधून चिमणराव पाटलांचे सुपूत्र अमोल यांचा मोठा विजय झाला आहे. अपक्ष भगवान महाजन यांना मिळालेली मतेही चक्रावून टाकणारी आहेत. केवळ पाच-सहा महिन्यांपूर्वी या मतदारसंघात राजकीय पटलावर आलेल्या महाजन यांना मिळालेली मते लक्षवेधी ठरली आहेत.


अमळनेर मध्ये मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या विजयामुळे भूमिपुत्राच्या मुद्याला मतदारांनी उचलून धरल्याचे दिसते. मंत्री झाल्यानंतर अनिल पाटलांनी केलेली विकासकामेही सहाय्यभूत ठरली. गेल्यावेळी पराभूत झालेल्या शिरीष चौधरी यांनी मध्यंतरीच्या कालखंडात अमळनेरकडे ढुंकूनही पाहिले नाही.


पाचोरा भडगाव मतदारसंघातील निकालही पुरेसा बोलका आहे. गेल्यावेळी प्रमाणे यावेळीही बंडखोर अमोल शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाऊ विरुद्ध बहीण ही लढत लक्षवेधी झाली. स्व. आर. ओ. तात्यांच्या मुलीला नाकारून पुतणे किशोरआप्पांना मतदारांनी पुन्हा निवडले आहे. अर्थात यात मतविभागणीचा मोठा हातभार आहे.
भुसावळच्या निकालाने राजकारणात हंगामी नेते चालत नाहीत हे दाखवत शांत, संयमी संजय सावकारे यांना चौथ्या वेळेस विधानसभेत पाठवले आहे. डॉ. मानवतकर यांनी गेल्या वेळीही निकाराची झुंज दिली होती. मात्र निकालानंतर सक्रिय राजकारणात ते दिसले नाहीत. माजी आमदार संतोष चौधरी यांनीही भावाचा प्रचार सांभाळून मानवतकर यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. पण सावकारेंनी त्यांच्यावर मात केली.


चोपड्यात शिंदे सेनेच्या प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना पुन्हा संधी मिळाली आहे.गेल्यावेळी त्यांच्या पत्नी सौ.लताताई यांना मतदारांनी संधी दिली होती.
गेल्या निवडणुकीत अवघ्या 4200 मतांनी विजयी होणार्‍या मंगेश चव्हाण यांना चाळीसगावकरांनी यावेळी तब्बल 85 हजारांचे मताधिक्य दिले आहे. ठाकरे गटाच्या उन्मेष पाटलांना शरद पवार गटाच्या राजीव पाटलांनी केलेली दिलसे मदत देखील त्यांचा पराभव वाचवू शकली नाही.

यावेळी दणकेबाज मतदान झाले. सर्वच मतदारसंघात मोठे मतदान झाले. मात्र शेवटच्या दोन तीन तासात वाढलेली मतदानाची टक्केवारी या निवडणुकीचे चरित्र सांगण्यास पुरेशी आहे. सर्वच अगदी राखीव मतदारसंघात देखील पैशांची मोठी आकडेमोड झाल्याची चर्चा आहे. 500 पासून 5000 पर्यंत पैसे दिल्याची चर्चा झडली. या चर्चेत तथ्य असेल तर मात्र परिस्थिती गंभीर आहे. यापुढे या जिल्ह्यात कोणीही केवळ विचारांच्या जोरावर निवडणुकीत यश मिळवू शकणार नाही. पैशांचा प्रचंड चुराडा हे या निवडणुकीचे दुर्दैवी वैशिष्ट्य ठरले, ते अधिक चिंताजनक आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या