जळगाव | प्रतिनिधी
पूर्व वैमनस्यातून तीन कैद्यांनी एका कैद्यावर प्राणघातक हल्ला चढवत त्यास लोखंडी पट्टीने जखमी केल्याची घटना जिल्हा कारागृहात आज दि.१५ बुधवारी ७.३० वाजता घडली.
जखमी कैद्यास वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णास उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत तीन कैद्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत आहे.
शुभम मनोज देशमुख उर्फ शिवम उर्फ दाऊद (वय २१) हा गेल्या वर्षभरापासून प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयालयीन कोठडीत होता. त्याठिकाणी इतर गुन्ह्यात असलेले तीन कैदी राकेश वसंत चव्हाण, राजू वसंत चव्हाण हे दोघे भाऊ आणि राहुल पंढरीनाथ पाटील या तिघांनी जुन्या वादातून हा हल्ला केला.
बुधवारी सकाळी ७.३० वाजता नियमितपणे उठल्यानंतर शुभम देशमुख याच्या पाठीमागून येवून त्यास बेदम मारहाण केली. यातील एकाने लोखंडी पट्टी घेवून त्यांच्या तोंडावर व कमरेवर वार करीत त्यास गंभीर जखमी केले आहे. जखमी अवस्थेत शुभमला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांनी जखमी कैदी शुभमचा जबाब घेतला आहे. त्यास मारहाण करणार्या तिघं कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.