जळगाव –
शहराजवळील खेडी येथे एका तरुणाने बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याच्या पत्नीवर कुर्हाडीने वार करुन तिची हत्या केली. खून केल्यानंतर तो तरुण पसार झाला आणि त्याने असोदा गॅस गोडावून जवळील रेल्वे लाइर्नवर धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आले.
खेडी येथील आंबेडकरनगरात समाधान रमेश साळवे (वय ३५) व सोनी समाधान साळवे (वय ३०, मूळ रा. धारशिरी, पाळधी, ह.मु.खेडी) हे मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी सायंकाळी ते सुरतहून नातेवाईकांकडून आले. रात्री १० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे जेवण करुन ते मुलांसह झोपले. बुधवारी पहाटे २ वाजता समाधान साळवे याने घरातील कुर्हाडीने त्याची पत्नी सोनीबाई साळवे हिच्या गळ्यावर जोरदार वार करुन तिचा खून केला.
हा प्रकार लक्षात येताच घरातील त्यांचा मुलगा व दोघं मुलींनी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारील रहिवासी घटनास्थळाकडे धावले. परंतु, तोपर्यंत मारेकरी घटना स्थळावरुन पसार झाला.
बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास असोदा गॅस गोडावूनजवळील रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली अज्ञात तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला असता त्याच्या नातेवाईकांनी त्याची ओळख पटवली, तो मृत तरुण या घटनेतील महिलेचा पती असल्याचे निष्पन्न झाले.
मृत दांपत्याच्या पश्चात दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. तसेच समाधान साळवे याच्या पश्चात धारशिरी गावी आई, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
या घटनेबाबत कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ विभागाचे डीवायएसपी गजानन राठोड, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ, उपनिरीक्षक संदीप पाटील आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. तर घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, दीपक कांडेलकर, राजेंद्र चौधरी आदी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मृत दांपत्याच्या नातेवाईकांची जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. दरम्यान, संशयित आरोपी समाधान साळवे याचे वडील रमेश साळवे हा देखील या अगोदर एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.