जळगाव | Jalgaon
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुतीने बिनविरोधचा धडाका लावला आहे. बँकेवर आधीच पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय सावकरेंच्या पत्नीसह ११ जागा बिनविरोध झाल्या असून, मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराविरुध्द भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे मैदानात असणार आहेत. महायुती म्हणून ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या.
दरम्यान इतर जागांवरही महायुतीने बिनविरोध करण्याचा धडाका लावला असून, नेत्यांच्या घरातील मंडळी निवडून येताना दिसत आहेत. जळगाव जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या ११ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या ६, भाजप ३ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या २ अशा ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटांकडून देवयानी देशमुख यांचा अर्ज कायम असल्याने मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील बिनविरोध
जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची जळगाव जिल्हा बँकेत संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. महाजन यांच्यासह रघुनाथ पाटील आणि तुकाराम विठोबा निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात रघुनाथ पाटील यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केल्यानंतर त्यांनी त्यावर आव्हान देत नाशिक येथे सहाय्यक निबंधक कार्यालयात हरकत दाखल केली होती. मात्र, तेथे त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. तर दुसरे उमेदवार तुकाराम निकम यांनी आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी महाजन यांना पाठिंबा देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन हे बिनविरोध विजयी उमेदवार ठरले आहेत.
दुसरीकडे, जळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे त्यांचाही विजय सुकर झाला. युतीधर्म पाळत भाजपाच्या जयश्री महाजन, प्रभाकर सोनवणे आणि विशेष म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे गुलाबराव पाटील हेही पहिल्यांदाच जळगाव जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून आले आहेत.
भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘या’ उमेदवारांना संधी
तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांची पाचोरा विकास सोसायटी मतदारसंघातून जळगाव जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. भाजपच्या सतीश शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे त्यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला. शिंदे गटाकडून आमदार चंद्रकात सोनवणे, मृणाल अमोल पाटील, नलिनी चिमणराव पाटील आणि सोमनसिंग खुमानसिंग पाटील यांची देखील जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे.
तर राष्ट्रवादीकडून धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघातून अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील आणि भाजपच्या गायत्री पाटील यांनी माघार घेतल्यामुळे पवार यांचा मार्ग मोकळा झाला. तसेच राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या अमळनेर सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर भाजपचे गिरीश महाजन यांच्यासह रोहित निकम आणि रजनी सावकारे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.




