जळगाव प्रतिनिधी |
तुकारामवाडीतील तरुणाचा मृतदेह मेहरुण तलावात आढळला. या तरुणाची ही आत्महत्या की घातपात? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.
फुले मार्केटमध्ये कॉस्मेटीकच्या दुकानात काम करणारा लक्ष्मण सुपडू निसळकर (वय ३५, रा. तुकारामवाडी) या तरुणाने मेहरूण तलावात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सेंट टेरेसा शाळेच्या पाठीमागे तलावात लक्ष्मणचा मृतदेह काही जणांना आढळला. याबाबत घटनास्थळावरील नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना कळवले. बीट मार्शन इम्रान सय्यद, मुदस्सर काझी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. या वेळी लक्ष्मणचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. तर त्याची मोटारसायकल (क्र. एमएच १९ डीजे ६६५४) तलावाजवळील रस्त्यावर होती. याबाबत कळताच सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. डॉक्टरांनी तरुणाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. लक्ष्मणच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
लक्ष्मण तलावात बुडाला की आत्महत्या आहे, की घातपात आहे, याबाबत नातेवाईकही संभ्रमात आहेत. हा तरुण सकाळी ८.३० वाजता कामानिमित्त घरातून मोटारसायकलने बाहेर निघाला होता. तो बेळी (ता.जळगाव) येथील मूळ रहिवाशी होता. त्याच्या पश्चात पत्नी सुनीता, मुलगा लकी, अजय असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.