जळगाव/यावल –
कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या किनगाव येथील विवाहितेचा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास निधन झाले.
या महिलेची शस्त्रक्रिया किनगाव ग्रामीण रुग्णालयात झाली होती. वैद्यकीय अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेचे पती गिरीश पाटील यांच्यासह नातेवाईकांनी केला आहे.
गिरीश माधवराव पाटील (रा. किनगाव, ता. यावल) हे टेलरिंगचे काम करतात. त्यांची पत्नी सुनीता गिरीश पाटील (वय 32) व दोन अपत्य भूमिका आणि कुणाल असा त्यांचा परिवार आहे.
गिरीश पाटील यांनी सुनीता यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासाठी किनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 23 नोव्हेंबर रोजी दाखल केले होते. शस्त्रक्रिया देखील त्याच दिवशी झाली.
सात दिवसांनंतर त्यांच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे या महिलेस जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात 30 नोव्हेंबर रोजी दाखल केले. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शस्त्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे जखम भरली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला.
यावल पोलिसात नोंद
किनगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. वैद्यकीय अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत महिलेचे पती गिरीश पाटील यांच्यासह नातेवाईकांनी केला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.