Friday, May 3, 2024
Homeनगरकाँग्रेसने शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आत्मचिंतन शिबिर घ्यावे - निर्मळ

काँग्रेसने शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आत्मचिंतन शिबिर घ्यावे – निर्मळ

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

काँग्रेसने राहाता तालुक्यातील शिर्डी शहरामध्ये नुकतेच चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. मात्र राज्यात शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न बिकट झाले असून शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. काँग्रेसने चिंतन शिबिराऐवजी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आत्मचिंतन शिबिर घ्यावे, अशी मागणी गणेशचे संचालक जालिंदर निर्मळ यांनी केली.

- Advertisement -

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्या सरकारमध्ये काँग्रेस हा पक्ष सत्तेत आहे. सध्या डिझेल भाववाढ, शेती मालाचे पडलेले भाव, अतिरीक्त उसाचा प्रश्न असे अनेक प्रश्न शेतकर्‍यांपुढे आ वासून उभे आहेत. केंद्र सरकारने डिझेलवरील अबकारी कर कमी करून शेतकर्‍यांना दिलासा दिला. मात्र राज्याने यामध्ये आडमुठी भूमिका घेतल्याने डिझेलचे भाव फारसे कमी होऊ शकले नाही.त्यामुळे शेतकर्‍यांना शेती मशागतीसाठी वाढीव दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे.

शेतकर्‍यांसाठी नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कांद्याचे भाव पडले आहेत. या भावात उत्पादन खर्च निघणे कठीण आहे. द्राक्ष शेतकर्‍यांचे भाव नसल्याने प्रचंड नुकसान झाले. राज्यात सर्वत्र अतिरिक्त उसाचा प्रश्न तयार झाला. राज्याच्या बेजबाबदार धोरणामुळे शेतकर्‍यांना त्रास व नुकसान सोसावे लागले.

सरकारमध्ये असूनही काँग्रेसने सत्तेसाठी या सर्व बाबीकडे दुर्लक्ष केले व स्वतःचा मोठेपणा मिरविण्यासाठी शिर्डी येथे चिंतन शिबिर घेतले. मात्र राज्यात शेतकरी व सर्वसामान्य नागरिक प्रचंड अडचणीत असताना राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसने चिंतन शिबिर घेण्याऐवजी शेतकरी प्रश्नावर आत्मचिंतन शिबिर घ्यावे व आपली जबाबदारी न झटकता शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे,, अशी मागणी गणेशचे संचालक जालिंदर निर्मळ यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या