Monday, May 27, 2024
Homeनगरजलजीवन मिशनच्या कामावरून पुणतांबा ग्रामसभेत ग्रामस्थांकडून प्रश्नाचा भडीमार

जलजीवन मिशनच्या कामावरून पुणतांबा ग्रामसभेत ग्रामस्थांकडून प्रश्नाचा भडीमार

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवणूक तलावाच्या दुरुस्तीच्या कामाबाबद ग्रामस्थांनी अधिकार्‍यांवर प्रश्रांची सरबत्ती केल्यामुळे ग्रामसभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ग्रामसभेस जलजीवन मिशन योजनेचे मुख्य अभियंता गैरहजर असल्यामुळे मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी बहिष्कार घातला.

- Advertisement -

मंगळवारी पुणतांबा ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. अध्यक्षस्थानी प्रशासक एस.बी.गायकवाड होते. सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी श्री. कडलक यांनी मागील ग्रामसभेचे इतीवृत्त वाचन केले. परंतु मागील ग्रामसभा तहकूब करण्यात आली होती. प्रभाग रचनेनुसार, आरक्षण व हरकती त्यामधील विषयाचा उल्लेख चालू ग्रामसभेत घ्यावा असे दादा सांबारे व सर्जेराव जाधव यांनी स्पष्ट केले. तर चंद्रकांत वाटेकर व सर्जेराव जाधव यांनी कोपरगाव येथील अभियंता मधुकर येवले यांना जलजीवन मिशन योजनेच्या काम सुरू असलेल्या संदर्भात प्रश्न विचारले. परंतु मुख्य अभियंता विशेष ग्रामसभेला उपस्थित नव्हते. म्हणून मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश जाधव, शहराध्यक्ष संदीप लाळे यांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकला.

15 कोटी 62 लाख रुपये खर्चाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या तळ्याचे काम अतिशय निकृष्ट प्रकारचे आहे. तळ्याच्या कामाला जुने दगड, माती, व मुरूम वापरण्यात आला आहे, तळ्यासाठी वापरल्या जाणारा कागद, योग्य दर्जाचा नाही. तसेच तळ्याच्या पश्चिम बाजूला तळ्याची खोली 60 एमएलटी केल्यामुळे तसेच मागील बाजूस कमी खोली निर्माण झाल्याने पुढील बाजूस पाणी येणार नसल्याचे, तसेच बांधकामासाठी नवीन मुरूम दगड आणलेली असेल तर त्याची रॉयल्टी भरलेली आहे का? याची सर्व माहिती द्यावी व सुरू असलेल्या योजनेमध्ये 12 एम.एम जाडीचे स्टील वापरणार असताना प्रत्यक्षात 9 एम.एम जाडीचे स्टील वापरण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत पुणतांब्याची पाणी योजना आठ वेळेस मंजूर झालेली आहे.

परंतु त्याची कामे पूर्ण झालेली नाही हा गावच्या पाण्याचा प्रश्न आहे यामध्ये कोणतेही राजकारण नाही. पुणतांबा गावाचा पाणी प्रश्न हा, या योजनेचे काम चांगले करून सुटला पाहिजे असे सर्जेराव जाधव व चंद्रकांत वाटेकर यांनी कोपरगाव अभियंत्याला ठणकावून सांगितले. यावेळी कृषी विभागामार्फत किरण धुमाळ व योगेश डाके यांनी प्रत्येक शेतकर्‍याने एक रुपया भरून शासनामार्फत पिक विमा काढून घ्यावा असे आव्हान केले. पुणतांबा गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प असल्याचे ग्रामविकास अधिकारी श्री. कडलग यांनी स्पष्ट केले. यावेळी घरकुल योजनेतील काही लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही मिळालेले नसल्याने त्यांनी समस्या मांडल्या.

याप्रसंगी प्रशासक गायकवाड, ग्रामविकास अधिकारी कडलक, तलाठी भारती लोखंडे, महावितरण उपअभियंता शितल कुमार जाधव, मुरलीधर थोरात, सदाशिव वहाटोळे, सुनील कुलट, भास्कर मोटकर, चंद्रकांत वाटेकर, गणेश बनकर, गणेश जाधव, सर्जेराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मंडलिक, प्राचार्य संजय थोरात, मुख्याध्यापक प्रदीप विधाते, सोमनाथ वैद्य, शिवसेनेचे अनिल नळे, अरुण थोरात, दादा सांबारे, मनोज गुजराथी, अरुण बाबरे, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग ग्रामस्थ, शेतकरी वर्ग, प्राथमिक शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या