Sunday, September 8, 2024
Homeनगरजालना घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपूर व तालुक्यात विविध ठिकाणी बंद

जालना घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपूर व तालुक्यात विविध ठिकाणी बंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्यावतीने श्रीरामपूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्या हाकेला प्रतिसाद देत शहरातील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय शंभर टक्के दिवसभर बंद ठेवून पाठिंबा दिला. तसेच तालुक्यातील विविध गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला.

- Advertisement -

या घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपूर बंद ठेवण्यासाठी शहरातील सकल मराठा समाजाच्यावतीने आदल्या दिवशी शहरातून फेरी काढून सर्व व्यावसायिकांना बंद पाळण्याबाबत सांगितले होते. सकल मराठा समाजाच्या हाकेला प्रतिसाद देत शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय दिवसभर बंद ठेवले. काल सकाळी गांधी पुतळा येथे निषेध सभा घेण्यात आली. याप्रसंगी शहरातील व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. निषेध सभेत जालना जिल्ह्यामधील अंतरवलीमध्ये शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षण आंदोलन सुरू होते. अचानक त्याठिकाणी दोन हजार पोलीस फोर्सने आंदोलकांवर लाठी हल्ला केला. त्यातील आंदोलक महिलांना मारहाण करण्यात आली. मुलांना बंदुकीच्या छर्‍याने जखमी करण्यात आले. 120 पेक्षा जास्त आंदोलकांना अ‍ॅडमीट होईपर्यंत मारले. या फोर्सला ऑर्डर देणारा कोण होता. या हल्ल्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच जालना जिल्हा पोलीस प्रमुखांना निलंबित करण्यात यावे, अशा मागण्या यावेळी आंदोलकांच्यावतीने करण्यात आल्या.

राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांधी पुतळा येथे येऊन सकल मराठा समाजाचे निवेदन स्विकारले. जालना येथे झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ना. विखे पाटील यांनी यावेळी दिले. तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत गृहमंत्री व मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष भागडे यांनी करोना काळात प्रवरा शिक्षण संस्थेत मराठा व ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ केली होती. याबद्दल सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांचे अभिनंदन केले. व मराठा आरक्षण प्रश्नी त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या