Thursday, May 23, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Andolan : लाठीचार्ज केला, गोळ्या झाडल्या.. हे दहशतवादी आहेत का?; छत्रपती...

Maratha Andolan : लाठीचार्ज केला, गोळ्या झाडल्या.. हे दहशतवादी आहेत का?; छत्रपती संभाजीराजेंचा संताप

जालना | Jalana

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी जिल्ह्यात मराठा आक्रोश मोर्चावर (Maratha Akrosh morcha) पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्या लाठीचार्जमध्ये आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक स्त्री-पुरुष जखमी झाले.

- Advertisement -

अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाल्याचे वृत्त पसरताच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, उपोषणस्थळी संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. राज्यात याआधी ५८ मोर्चे निघाले पण एकही गालबोट लागलं नाही. मात्र काल जे अमानवी घडलं ते वाईट आहे. लाठीचार्ज करण्यात आला. गोळ्या घातल्या, हे काय दहशतवादी आहेत का असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला.

संभाजीराजे म्हणाले की, ही भाषणाची वेळ नाही. पण हे महाराष्ट्रात घडलं, त्यावर प्रतिक्रिया देणं आणि काल जो प्रकार घडला त्यावर बोलण क्रमप्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांचा वंशज म्हणून इथे आलो आहे. माझे खापर आजोबा शाहू महाराज यांनी सगळ्यांना आरक्षण दिलं. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं या साठी मी २००७ पासून काम करतो आहे. ५८ मोर्चे निघाले एकाही मोर्चाला गालबोट लागले नाही. सरकारच्या माध्यमातून जे अमानवी कृत्य झालं ते वाईट आहे. गोळ्या झाडल्या अश्रू धुराच्या नळकांड्या उडवल्या. शिवाजी राजे यांच्या राज्यात हे घडतं? निजामाच्या राज्यात हे घडत होतं. आता शिवाजी महाराजांच नाव घेऊन सुराज्य घडवायचं म्हणता पण हे सुराज्य आहे का? हे निजामाचं, मुघलांचे राज्य आहे का? मराठ्यांवर गोळी झाडायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर झाडा असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी जालन्यातील घटनेवर संताप व्यक्त केला.

ज्या मानसांनी हे आदेश दिले त्याचे निलंबन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तसेच यावर सरकारने स्पष्टीकरण द्यायला हवं. तुमचं सरकार दिल्लीत आहे, महाराष्ट्रात आहे. तुम्ही सांगा किती वर्षे लढा द्यायचा. हे पाकिस्तानी, मुघल, दहशतवादी आहेत का? यांच्यावर लाठीचार्ज करता. आम्हाला न्याय कधी देणार, किती समित्या नेमणार? असा सवाल राजेंनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या