अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
स्थानिक गुन्हे शाखेने फक्राबाद (ता. जामखेड) येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत 5 लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवारी (30 नोव्हेंबर) पहाटे झालेल्या या कारवाईत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एक ब्रास वाळू हस्तगत करण्यात आली असून चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू उत्खननावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या नेतृत्वात पथकाला रविवारी पहाटे माहिती मिळाली की, आरणगाव-हाळगाव रस्त्याने चौंडी परिसरातून वाळू चोरून फक्राबादकडे ट्रॅक्टर-ट्रॉलीने वाहतूक होत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने फक्राबाद शिवारातील हॉटेल मामाश्रीजवळ सापळा रचला. काही वेळातच संशयित वाहन त्या दिशेने येताना दिसताच पथकाने त्याला थांबवून तपासणी केली. तपासात ट्रॉलीमध्ये वाळू भरलेली आढळली.
चालकाने आपले नाव रवींद्र ऊर्फ राम बाबासाहेब उबाळे (वय 26, रा. चौंडी, ता. जामखेड) असे सांगितले. वाळू वाहतुकीबाबत परवाना किंवा रॉयल्टी पावती विचारली असता त्याच्याकडे कोणतेही कागद नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने चालकास ताब्यात घेत 10 हजार रूपये किमतीची एक ब्रास वाळू व पाच लाख रूपये किमतीचा ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण पाच लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




