जामखेड । तालुका प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश मिळत आहे. जामखेड-नान्नज रोडवरील चुंबळी गावच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून तब्बल १ लाख ६८ हजार ९६० रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे जामखेड तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चुंबळी शिवारातील ‘न्यू रशिका’ हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची साठवणूक आणि विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने २८ डिसेंबर रोजी हॉटेलवर अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी देशी दारूचे एकूण ४४ सीलबंद बॉक्स जप्त केले. प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या याप्रमाणे मोठ्या प्रमाणात साठा हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी हॉटेल चालक तुषार विठ्ठल जगताप (वय ३२, रा. शिवाजीनगर, जामखेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस नाईक श्यामसुंदर अंकुश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८३/२०२५ नुसार दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना कडक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पो. नि. कबाडी यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. या पथकात पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, श्यामसुंदर जाधव आणि चालक अरुण मोरे यांचा समावेश होता.




