अहिल्यानगर/जामखेड |प्रतिनिधी| Ahilyanagar | Jamkhed
जामखेड शहरात एका घरावर दरोडा (Jamkhed Robbery) टाकणार्या टोळीतील सात जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून दोन वाहने व चार लाखाचे सोन्याची लगड असा 17 लाख 45 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. अनिल मच्छिंद्र पवार (32), सुनील धनाजी पवार (19), संतोष शिवाजी पवार (22, तिघे रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव), रमेश मत्या काळे (47 रा. म्हसा खांडेश्वरी, ता. कळंब, जि. धाराशिव), बाबा आबा काळे (25), अमोल सर्जेराव काळे (23), शिव अप्पा पवार (24, रा. बावी, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी अटक (Arrested) केलेल्या सात जणांची नावे आहेत.
याच टोळीतील त्यांचे साथीदार कुक्या बादल काळे (रा. मोहा, ता. कळंब), सचिन काळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. जामखेड) व महिला शालन अनिल पवार (रा. तेरखेडा) हे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 26 फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास, प्रतीक्षा शंकर रोकडे या आपल्या कुटुंबीयांसह झोपेत असताना एका महिलेने ‘दिदी, दरवाजा खोलो’ अशी हाक दिली. दरवाजा उघडताच 7 ते 8 जण तोंडाला रूमाल बांधून, धारदार शस्त्रांनी घरात घुसले. त्यांनी कुटुंबातील महिलांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे 1 मार्च 2025 रोजी जामखेड-खर्डा मार्गावर मारूती मंदिराजवळ सापळा रचून या गुन्ह्यातील सात जणांना अटक केली. दरम्यान, सचिन काळे याच्या सांगण्यावरून ही टोळी जामखेड (Jamkhed) येथे आली होती व त्यांनी दरोडा (Robbery) टाकला अशी कबूली मुख्य सुत्रधार बाबा काळे याने दिली.