जामखेड । तालुका प्रतिनिधी
नाहुली येथील व्हेटरनरी डॉक्टर प्रल्हाद जाधव (वय २४) यांचा आज सकाळी झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. खर्डा रोडवरील कोल्हे पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकलवरून जात असताना ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना झालेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. जाधव जामखेड येथून जनावरांची औषधे घेऊन नाहुली गावाकडे परतत होते. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. घटनास्थळीच ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. तातडीने त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संपूर्ण परिसरात या दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे डॉ. जाधव यांचे लग्न अवघ्या आठवड्यानंतर, म्हणजेच २३ मे रोजी होणार होते. घरी लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात असताना या दुर्घटनेने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डॉ. प्रल्हाद जाधव गेली दोन वर्षे मुक्या प्राण्यांची सेवा करत होते. त्यांनी व्हेटरनरी कोर्स पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. परिसरात ते कुशल पशुवैद्यक म्हणून परिचित होते. सुरुवातीला त्यांनी जामखेड शहरातील एका मेडिकलमध्ये काम केले होते आणि नंतर व्हेटरनरी व्यवसायात स्थायिक झाले.
त्यांच्या सेवेबद्दल अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते. प्राण्यांवरील त्यांची निस्सीम प्रेमभावना आणि सेवा वृत्तीमुळे त्यांचा विशेष सन्मान केला जात असे. त्यांच्या जाण्याने परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जाधव यांच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळींवर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष कोपनर हे करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जामखेड तालुका हादरला आहे. एक होतकरू, सेवाभावी युवक काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख सर्वत्र व्यक्त होत आहे.