श्रीनगर | Shrinagar
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जम्मूमधील ८ आणि काश्मीरमधील १६ म्हणजेच एकूण २४ जागांसाठी हे मतदान होत आहे.
सकाळी ७ वाजल्यापासून मतदान होत आहे. ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान झाले आहे. मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा, माजी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांसह महिला नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तब्बल १० वर्षांनी आणि अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच होत आहेत. चार महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीही शांततेत मतदान होण्याची अपेक्षा आहे.
तब्बल साडेतीन दशकांच्या कालावधीत यंदा प्रथमच काश्मीर खोऱ्यात कोणत्याही भीतीविना प्रचार सभा पार पडल्या. त्यामध्ये जनतेचा उत्साही सहभागही दिसून आला. आज पहिल्या टप्प्यात २३.२७ लाखांहून अधिक मतदार असून, यात ११.७६ लाख पुरूष, तर ११.५१ लाख महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पहिल्या टप्प्यात ४ जागांवर सर्वांची नजर
बिजबेहरा सीट : पहिल्या टप्प्यात ज्या ४ जागांवर साऱ्यांची नजर आहे, त्यात बिजबेहराची जागा सर्वात टॉपला आहे. या जागेवर मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. ती पहिल्यांदाच निवडणूक लढवतेय.
कुलगाम सीट : बिजबेहरानंतर कुलगाम जागेची चर्चा आहे. या जागेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे मोहम्मद युसूफ तारिगामी सलग पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. तसेच पीपल्स काँन्फ्रेन्समधून अहमद लावेदेखील रिंगणात आहेत.
अनंतनाग जागा : या जागेवर पीरजादा मोहम्मद सईद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जे जम्मू काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष असून कोरनाग जागेवरुन आमदार राहिले आहेत. पीडीपीने अनंतनागहून महबूब बेग यांना उमेदवारी दिलीय.
पुलवामा सीटी : या जागेवर पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी आणि नॅशनल काँन्फ्रेन्समध्ये थेट लढत आहे. पीडीपीने वहीद उर रहमान पारा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.जे पीडीपी यूवाचे मुख्य असून त्यांच्यावर दहशतवादाचा आरोप आहे. यासोबतच नॅशनल काँफ्रेंन्सने मोम्मद खलील बंदला तिकिट दिलंय. जे २००२, २००८ आणि २०१८ मध्ये पीडीपीच्या तिकिटावर पुलवामात निवडणूक जिंकले आहेत. पण २०१८ मध्ये पीडीपी सोडून त्यांनी नॅशनल काँफ्रेन्सध्ये प्रवेश केलाय.