नाशिक । प्रतिनिधी
कालावंतांकडे दिव्य दृष्टी असते, ते जीवन अधिक सुंदर बनवतात. नाशिक हे प्रथमपासूनच उच्च अभिरूची असणारे कलाकार व रसिक याचे केंद्र असल्याचे सिद्ध झालेले आहे. जनस्थानने चित्र, शिल्प, नाट्य,साहित्य,संगीत,नृत्य इ विविध कलाकारांना एकत्र आणण्याचा उपक्रम गेल्या ९ वर्षांपासून जनस्थानने सुरू केला तो गौरवास्पद आहे. असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी केले.
जनस्थान महोत्सव व चित्र,शिल्प,छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन कुसुमाग्रज स्मारकाच्या कलादालनात रविवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ड. नितीन ठाकरे आणि नामवंत विधीज्ञ डॉ. मंदार भानोसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर व्यासपीठावर अभय ओझरकर, स्वानंद बेदरकर व विनोद राठोड हे जनस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जनस्थान व्हाट्सप ग्रुपच्या माध्यमातून सर्व कलाकार व रसिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. आपल्या ग्रुपला मराठा विद्या प्रसारक समाजाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही यावेळी मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी दिली. मंदार भानोसे म्हणाले की, कलाकारांना जगभरातून दाद मिळत असली तरी आपल्या शहरातून प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा असते.
जनस्थानच्या माध्यमातून ती पूर्ण होत आहे याचे समाधान वाटते. सूत्रसंचालन नंदन दीक्षित यांनी केले, प्रास्ताविक सी.एल.कुलकर्णी आणि मनोज जोशी यांनी केले. ज्येष्ठ चित्रकार धनंजय गोवर्धने यांनी आभार मानले.
’दि. १८ ते २१ तारखेपर्यंत असे चार दिवस ’नवरंगात रंगली सृष्टी’ या चित्र – शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ चित्रकार आणि जनस्थानचे सदस्य कै. अनिल माळी यांचे नाव कलादालनाला देण्यात आले आहे.
’ प्रदर्शनात जनस्थानीय चित्रकार चारूदत्त कुलकर्णी, धनंजय गोवर्धने, आनंद ढाकीफळे, राजा पाटेकर, केशव कासार, नंदन दीक्षित, प्रसाद पवार, अतुल भालेराव, राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, निलेश गायधनी, पुजा गायधनी, स्नेहल एकबोटे, पूजा बेलोकर यांच्याबरोबर बबन जाधव, अनिकेत महाले, शेफाली भुजबळ, भुवनेश्वरी भुजबळ, तृप्ती चावरे – तिजारे यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली तर शिल्पकारांमध्ये संदीप लोंढे, यतीन पंडित, श्रेयस गर्गे
वरूण भोईर( आमंत्रित शिल्पकार)
’मिसळ क्लब’च्या सदस्यांमध्ये मनोज जोशी, सचिन पाटील, नितीन बिल्दीकर, किरण पाटील, सुनिल महामुनी,सिद्धेश्वर आहेर, योगेश वाल्दे, दैनिकातील छायाचित्रकरांमध्ये सोमनाथ कोकरे, प्रशांत खरोटे , सतिश काळे, पंकज चांडोले, अशोक गवळी केशव मते, यतीश भानू, रवी ताम्हणकर यांचा सहभाग आहे.
नाशिक (नासक) हिरा बघायची संधी
उत्कंठा व प्रेमाचा प्रतीक असलेला जगप्रसिद्ध नाशिक (नासक) हिरा या हिऱ्यास त्रंबकेश्वर येथे मिळून आल्याने यास आय ऑफ शिवा या नावाने देखील जगात प्रसिद्धी मिळालेली आहे असा हा आपल्या नाशिकचा हिरा जगात सर्वात दुर्मिळ व मौल्यवान हिऱ्याच्या सूची मध्ये पहिल्या १० हिऱ्यांमध्ये याची गणना केली जाते असा आपल्या नाशिकचा वारसा असलेला नाशिक हिऱ्याची प्रतिकृती या प्रतिकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी त्याच वजन व साईज मध्ये तसेच मूळ नाशिक हिऱ्याप्रमाणेच पैलू पाडलेला व क्यूबिक झिरकॉन या रत्ना मध्ये बनवलेला नाशिक हिऱ्याची प्रतिकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. चेतन राजापूरकर यांनी त्यास सहकार्य केले आहे. प्रदर्शनाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा असे आवाहन ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर यांनी केले आहे.