गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi
पोटगीची केस केल्याच्या कारणावरुन जात पंचायतीने केलेला अडीच लाखांचा दंड न भरल्याने कुटुंबाला वाळीत टाकल्याची फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दाखल झाली असून या फिर्यादीवरून 11 जणांवर सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हरिचंद्र रामचंद्र जाधव (वय 76) रा. खडकी ता. दौंड जि. पुणे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 17 मे 1996 ते 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत गंगाधर तात्या सुरपे (रा. रावळगाव), विश्वनाथ गंगाराम शेगर, राजाराम नाना खिलारे, जनार्दन काशिनाथ शेगर (तिघेही राहणार जामखेड रोड करमाळा), बाबुराव नारायण सुरपे (रा. समतानगर दौंड), गौरव भैरु बाबर (रा. पाटस दौंड), एकनाथ काशिनाथ शेगर , अक्षय एकनाथ शेगर (दोघे रा. करमाळा), भिमराव रामहरी सावंत (रा. पाटस), शामराव भिमराव शेगर (रा. अंथरुणे, इंदापूर), भगवान शंकर शिंदे (रा. काष्टी), नामदेव बाबुराव शिंदे (रा. ब्राम्हणी), यांनी नाथपंथी डवरी गोसावी जातीची जातपंचायत भरवली.
तुम्ही पोटगीची केस का केली? तुमच्या विरुद्ध चार लोक तक्रार देण्यासाठी आले आहेत. असे म्हणून तुमचा न्याय करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी फिर्यादीच्या वडिलांकडे पैसे नसल्याने त्यांनी आत्ता माझेकडे पैसे नाही असे म्हणाले असता वरील लोकांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबातील लोकांना वाळीत टाकले असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. दाखल फिर्यादीवरून गुन्हा र. नं. 344/2024 सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध व निवारण) अधिनियम 2016 मधील जनतेचे संरक्षण कलम 3,5,6,7, भा.द.वि.कलम 323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार श्री. अडकित्ते हे करत आहेत.