मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. अजितदादांचा निधन हे अपघातामुळे नव्हे तर घातपातामुळेच झाले, असा दावा रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. अशातच आता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हीएसआरच्या पायलटशी संबंधित एक धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
जय पवारांनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो — या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी. अशी पोस्ट जय पवार यांनी केली आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हंटले आहे की, “DGCA ने ज्या मुद्द्यांवर VSR Ventures ची काही विमानं ग्राऊंड केली आहेत, त्याच मुद्द्यांवर इतर विमानांमध्ये त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारु शकत नाही. जर सुरक्षेसंदर्भात नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील, तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण VSR फ्लीटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, आवश्यक असल्यास VSR च्या संपूर्ण ताफ्याचे पूर्णपणे संचलन बंद करण्याचाही DGCA ने विचार करावा.” अशी आणखी एक पोस्ट लिहून जय पवार यांनी DGCA कडे VSR कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.





