राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्त पाणीसाठा 88.54 टक्क्यांवर पोहचला होता. दरम्यान जायकवाडीतून खाली पुन्हा गोदावरीत कोणत्याहीक्षणी विसर्ग केला जाऊ शकतो. जलसंपदा विभागाने याबाबत परिपत्रक काढून सहा जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडी जलाशयात 16 हजार 17 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. या धरणात जिवंत पाणीसाठा 67.87 टीएमसी इतका झाला होता. तर मृतसह एकूण साठा 93.94 टीएमसी इतका झाला आहे. या धरणाची क्षमता 102.73 टीएमसी इतकी आहे. सुमारे आठ टीएमसी पाणी धरण तुडूंब भरण्यास कमी आहे. अजुनही पाऊस शिल्लक असल्याने सतर्कता म्हणुन जलसंपदा विभाग केव्हाही या धरणातून विसर्ग सोडू शकते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान जायकवाडी धरणातून जायकवाडी उजव्या कालव्यातुन 500 क्युसेकने विसर्ग माजलगाव धरणाच्या दिशेने सोडण्यात येत आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्यातून 3155 क्युसेक ने विसर्ग गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येत आहे. काल दिवसभर धरणांच्या परिसरात 5 ते 7 मिमी च्या दरम्यान पाऊस होता. पाऊस नगण्य असल्याने नवीन पाण्याची आवक नाही. त्यामुळे विसर्ग स्थिर आहेत. मात्र गंगापूर मधुन दोन दिवसांपासून पुन्हा पाणी सोडण्यात येत आहे. गंगापूरचा विसर्ग बंद होता.
तो पुन्हा 1105 क्युसेकने सोडण्यास सुरुवात झाली आहे. दारणातुन 2071 क्युसेक, वालदेवीतुन 183 क्युसेक, आळंदीतुन 87 क्युसेक, पालखेड मधुन 1696 क्युसेक, करंजवण मधुन 1505 क्युसेक, वाघाड मधुन 343 क्युसेक, तिसगाव मधुन 106 क्युसेक, तर ओझरखेड मधुन 68 क्युसेक असे विसर्ग सुरु आहेत. नांदूरमधमेश्वर बंधार्यातुन जायकवाडी च्या दिशेने गोदावरीत एकूण 40 टीएमसी पाण्याचा विसर्ग काल सकाळी 6 पर्यंत एकूण करण्यात आला.