Saturday, September 28, 2024
Homeनगरपवार-पिचड भेटीवर जयंत पाटलांनी बोलणे टाळले

पवार-पिचड भेटीवर जयंत पाटलांनी बोलणे टाळले

अहमदनगर | प्रतिनिधी

पिचड पिता पुत्रांनी शरद पवार यांची भेट नेमकी कशासाठी घेतली हे माहीत नाही. पण, भेट कोणीही घेऊ शकतो. भेट घेतली म्हणजे ते पक्षात आले असे होत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त करत पिचड पिता- पुत्रांच्या भेटीवर अधिक भाष्य टाळले. दरम्यान, महाविकास आघाडीचे जागा वाटप घटस्थापनेपूर्वी शक्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

आ. पाटील हे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त नगर शहरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतल्याने ते पुन्हा राष्ट्रवादीत येणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. याबाबत पत्रकारांनी आ. पाटील यांना विचारले असता त्यांनी त्या भेटी विषयी अधिक बोलणे टाळले. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत विचारले असता याबाबत काही माहीत नाही आणि चर्चाही झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या धोरणावर चर्चा केली, त्यासंदर्भात आ. पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकारने अद्याप काहीच केलेले दिसत नाही. मराठा आरक्षणाचा आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे. तरी सरकारने मराठा आरक्षण व ओबीसीसंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा. आमचा सरकारला पाठिंबा आहे. दरम्यान, तत्पूर्वी शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत बोलताना आ. पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आणलेल्या विविध योजनांवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, लोकसभेनंतर सरकार जागेवर आले. गेल्या दोन महिन्यांपासून घोषणा करीत आहे. अजून दीड महिना बाकी आहे; पण घोषणा करायला पैसे नाहीत. रिझव्ह बँकेला पत्र पाठवून सव्वा लाख कोटींच्या खर्चाची मागणी केली आहे. पहिलेच आठ लाख कोटींचे कर्ज असून, त्यावर सव्वा कोटी लाखांची मागणी केली आहे. त्यामुळे सरकार बाहेर जाताना आठ ते दहा लाख कोटींचे कर्ज करण्याच्या प्रयत्नात आहे. लोकसभेनंतर जे लाडके नव्हते ते आता लाडके वाटायला लागले आहेत. मात्र, ते तुमच्यासाठी नव्हे तर लाडक्या खुर्चीसाठी चालले आहे अशी टीका त्यांनी केली.

राज्यात महिला भगिनी, शालेय विद्यार्थिनी सुरक्षित नाही. मुली शाळेत गेल्यानंतर घरी सुरक्षित येतील की नाही याची काळजी आई-वडिलांना असते. ही राज्यातील कायदा व सुव्यवस्थची स्थिती आहे. कारण सरकारचा पोलिसांवर वचक नाही आणि पोलिसांचा त्यांच्या हद्दीत जरब दिसून येत नाही. राज्यात आमचे सरकार आल्यानंतर कायद्या दुरूस्ती केली जाईल, पोलिसांची जबाबदारी व कामकाजातही सुधारणा केली जाईल, यामुळे मुली व महिलांना हात लावण्याची कोणत्याही गुंडामध्ये हिंमत राहणार नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या