अकोले |प्रतिनिधी| Akole
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे गुरुवारी (दि. 26) अकोले तालुक्यातील कोतूळ येथे आगमन झाले असता त्यावेळी मंचावर सर्वच प्रमुख नेते होते. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी भाषणाला सुरुवात करताच एका कार्यकर्त्याने उमेदवारी जाहीर करा, अशी जाहीर मागणी केली. त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी असे असेल तर मी माझे भाषण थांबवतो असे म्हणून भाषण थांबविले व ते निघाले. शांत, संयमी जयंत पाटील यांचे हे रूप पाहून सर्वजण अवाक झाले. मात्र व्यासपीठावरील प्रमुख कार्यकर्त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या भाषणास सुरुवात केली.
दरम्यान, पाटील यांच्या भाषणापूर्वी एका कार्यकर्त्याने उमेदवारी जाहीर करा अशी मागणी केली. त्यामुळे त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत संबंधित कार्यकर्त्याला उद्देशून म्हणाले, या मतदारसंघात कुणाला उभे करणार हे जर तुला कळले नसेल तर तुझ्यासारखा वेडा माणूस दुनियेत नाही. तुझ्या बुध्दीची कीव करतो, अशा भाषेत त्या कार्यकर्त्याला फटकारले. आज स्व. अशोक भांगरे असते तर तेच आपले उमेदवार असते असे ते म्हणाले. आपल्याला आघाडी टिकवायची आहे त्यामुळे आघाडीचे जागा वाटप झाल्यानंतर आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर उमेदवारांची घोषणा केली जाईल असे ते म्हणाले. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
आपली लढाई धनशक्तीच्या विरोधात आहे. सगळ्या मार्गाने पैसे गोळा करणार्यांच्या विरोधात आहे. आपल्या समोरच्या उमेदवाराच्या मागे जे आहेत त्यांनी लई गोळा केलं आहे. एकेका मतदारसंघात पंधरा पंधरा – वीस वीस कोटी रुपये खर्च करण्याची त्यांची तयारी आहे. लोकसभेला हे सर्व करून झालं पण राज्यातील जनता हुशार आहे. अकोलेची जनता तर फारच हुशार आहे, पण तुमचा काही फायदा होत असेल तर आपली काही हरकत नाही, असे मिश्किलपणे सांगत सकाळी मतदानाला जाताना मात्र तुतारीच फुंकायची हे लक्षात ठेवा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. खासदार डॉ.अमोल कोल्हे, नीलेश लंके, आमदार सुनील भुसारा, महेबूब शेख, सुनीता भांगरे, अमित भांगरे, सुरेश गडाख, बी. जे. देशमुख, विनोद हांडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी अजित पवार गटात गेलेले विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, यावेळीही अकोल्यात महविकास आघाडीचे पारडे जड आहे. आपले सरकार असताना पश्चिमवाहिनी नद्या पूर्वेकडे वळवून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मधल्या काळात ते मागे पडले. सरकार आल्यावर ते पुन्हा सुरू केले जातील. तसेच तालुक्याचे विविध प्रलंबित प्रश्नही मार्गी लावले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आपल्याला राज्यातील महायुतीचे सरकार घालवायचे आहे असे सांगताना या सरकारचा भ्रष्ट सरकार असा उल्लेख करीत तिखट शब्दांत सरकारवर टीका केली.