बारामती | Baramati
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाथ्यक्ष जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक वक्तव्य केले होते. माझे काही खरे नाही, माझी ग्यारंटी घेऊ नका असे त्यांनी म्हटले होते, यावरून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली, आता त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या आंदोलनावेळी जयंत पाटील यांनी माझी गॅरंटी घेऊ नका… माझे काही खरे नाही, असे वक्तव्य केल्याने ते लवकरच आपल्या मनगटावर घड्याळ बांधतील, अशी शक्यता अनेक नेतेमंडळी वर्तवत आहेत. तसेच त्यांच्या मनातली अस्वस्थता त्यांचे जुने मित्र हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवल्यानंतर खरोखर त्यांचा पक्षप्रवेश होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर या सगळ्या चर्चांवर जयंत पाटील यांनी बारामतीत जाऊनच स्पष्टीकरण दिले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासंबंधीच्या चर्चांवर प्रश्न विचारले. त्यांनी या चर्चांचे स्पष्टपणे खंडण करताना शरद पवार यांची साथ सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगितले.
मी नाराज वैगरे काही नाही
मी नाराज वैगरे काही नाही, तशीही मला बाहेर बोलायची चोरी झाली आहे. मी भाषण केले त्याचा रेफरन्स बघा. शक्तीपीठ रस्त्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला, त्यांच्यासमोर भाषण करताना मी ते म्हंटलो होतो. राजू शेट्टी यांनी झेंडा हातात घेतलाय म्हंटल्यावर काही काळजीच कारण नाही. हा विनोदाचा भाग होता. राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही, त्यांना आम्ही उभे राहायला सांगत होतो. ‘त्यामुळे माझे तुम्ही गृहीत धरू नका, खरे धरू नका तुम्ही तुमचे आंदोलन सुरू ठेवा. तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे,’ अशी त्यामागची भावना होती, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करीत आहोत. निवडणुकीत हार जीत होत असते. आमची संख्या विधानसभेत कमी असेल पण शरद पवार यांच्यावर प्रेम करणारी महाराष्ट्रात असंख्य माणसं आहेत. राष्ट्रवादी हा त्यांचा पक्ष आहे. पक्षाच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम आम्ही सर्वजण करीत असतो. त्यामुळे पक्षाच्या हिताच्या विरोधात निर्णय घेणे होऊ शकत नाही. माझ्या पक्षबदलाच्या चर्चा त्यामुळे निरर्थक आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा