नाशिक | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ काल नाशिक जिल्ह्यात (Nashik District) दाखल झाली आहे. काल नाशिक शहरात शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने सभा पार पडली. त्यानंतर आज ही यात्रा दिंडोरीत (Dindori) असून या यात्रेत अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ (Narahari Zirwal) यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ उपस्थित आहेत. गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताचे फलक देखील दिंडोरीत लावले आहेत. त्यामुळे गोकुळ झिरवाळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.
हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांची तारांबळ
अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांच्या विधानसभेच्या उमेदवारीबाबत मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, गोकुळ झिरवाळ यांनी उमेदवारीसाठी आमच्या पक्षाकडे अर्ज केलेला आहे. मात्र, आमच्या पक्षाने अजून उमेदवार ठरवलेला नाही, अशी माहिती जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना दिली. तसेच गोकुळ झिरवाळ यांनी माझा फलक लावला याचा अर्थ असा की, त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. त्याबरोबरच त्यांच्या पक्षप्रवेशाची काहीही चर्चा झालेली नाही, तसा संपर्कही झालेला नाही. असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Sanjay Raut : “…तर गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा” – संजय राऊत
दरम्यान, काही दिवसांपूवी नरहरी झिरवाळ यांनी बोलतांना म्हटले होते की, जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले होते. जयंत पाटील माझा नेता आहे त्यांचा जाऊन सत्कार कर, अशा सूचना गोकुळला दिल्या होत्या. तिथे त्याला विचारले बापासारखे त्याच्यात काही गुण आहेत. म्हणून त्याने निवडणूक (Election) लढविण्याचे सांगितले होते. त्यामुळे संभ्रम तयार झाला, पण आता तो जागेवर आहे आणि कायमस्वरूपी जागेवर राहणार आहे, असे नरहरी झिरवाळ म्हणाले होते. मात्र,आज गोकुळ झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’त सहभागी झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : दत्तक नाशिकची आश्वासन पूर्तता करण्यात महायुती अयशस्वी – जयंत पाटील
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ काल नाशिक शहरात होती. यावेळी शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे व राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोरच विधानसभा निवडणुकीच्याइच्छुक उमेदवारांच्या यादीवरून नाशिकचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी जिल्ह्यातील इच्छूकांची यादी जाहीर केली होती. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी आव्हाड यांना पक्षाच अध्यक्ष केले तर ते महाराष्ट्र मुकवतील,असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर केले.तर जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी गजानन शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना मारणाऱ्याचा हात धरू शकतो, बोलणाऱ्याचे तोंड नाही. त्यांना माझ्याबद्दल असे का म्हणायचे होते मला अजूनही समजले नाही. असे जाहीर वक्तव्य करणे टाळायला पाहिजे. एखाद्याच्या स्वभावाला औषध नसते. अशा स्वरूपाच्या विधानामुळे पक्षवाढीवर परिणाम होतो, असे म्हटले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा