नागपूर । Nagpur
महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात राम खाडे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. या घटनेला पंधरा दिवस उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ते असलेले राम खाडे यांच्यावर हॉटेलसमोर प्राणघातक हल्ला झाला होता. हल्ला करणारे १० ते १२ लोक त्यांना मृत समजून घटनास्थळावरून निघून गेले होते. या संदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करत, “पोलीस हजामती करतात की काय?” असा प्रश्न उपस्थित केला. जयंत पाटील यांच्या या ‘हजामती’ या शब्दावर मंत्री संजय सावकारे यांनी आक्षेप घेतला. त्यांनी पाटील यांना तो शब्द वापरू नका, असे सांगितले. त्यावर जयंत पाटील यांनी थेट प्रतिआव्हान देत, “तुम्ही प्रतिशब्द सांगा, मला मराठी कमी येते,” असे म्हटले. यानंतरही ते आपला शब्द न हटवण्यावर ठाम राहिले.
सावकारे यांनी तालिका अध्यक्षांना हा शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. या मागणीला उत्तर देताना जयंत पाटील यांनी सावकारे यांना टोला लगावला, “मंत्री झाला म्हणून लय कळत नाही.” राम खाडे हे आपल्या पक्षाचे पदाधिकारी असून ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. खाडे यांनी अनेक देवस्थान जमिनींचे मोठे घोटाळे उघडकीस आणले आहेत. यापूर्वी राम खाडे यांना पोलिसांनी संरक्षण पुरवले होते, मात्र नंतर ते काढून घेण्यात आले. तसेच, त्यांच्या बंदुकीच्या परवान्याचे नूतनीकरणही केले गेले नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली.
तालिका अध्यक्षांनी ‘हा शब्द रेकॉर्डवरून काढण्यात येत आहे,’ असे जाहीर केले. त्यावर जयंत पाटील यांनी पुन्हा प्रतिप्रश्न केला, “कुठला शब्द?”. ते पुढे म्हणाले, “हजामती हा शब्द असंसदीय नाही. मी सरकारवर नव्हे, तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहे. हा शब्द कामकाजातून का हटवत आहात, याचे कारण स्पष्ट करा,” अशी मागणी त्यांनी केली. या प्रकारामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते.




