मुंबई । Mumbai
भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी हे आरोप करताच राजकीय वातावरण तापले आहे.
वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपांनंतर मनोज जरांगे पाटील तसेच अंजली दमानिया यांनीही गोरेंवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली.
गोरे यांनी सांगितले की, २०१७ साली त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. त्या काळात त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मसवड पालिकेची निवडणूक होती. त्याच पार्श्वभूमीवर हा गुन्हा नोंदवला गेला. मात्र, २०१९ साली न्यायालयाने निकाल देत त्यांना निर्दोष मुक्त केले. त्याचबरोबर जप्त केलेला मुद्देमाल आणि मोबाईल नष्ट करण्याचे आदेश दिले होते.
ते म्हणाले, “लोकशाहीत न्यायालय हे सर्वोच्च असते. न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केल्याला सहा वर्षे झाली आहेत. आता हे प्रकरण पुन्हा पुढे आणले जात आहे. राजकीय नेत्यांनी बोलण्याला मर्यादा ठेवायला हवी.”
“माझ्या वडिलांचं सात दिवसांपूर्वी निधन झालं, त्यांचे अस्थी विसर्जनही मला करू दिले नाही. इतके खालच्या स्तरावर जाऊन राजकारण होईल अशी अपेक्षा नव्हती,” असे भावनिक उद्गार काढले.
शेवटी, त्यांनी विरोधकांना इशारा देत सांगितले की, “मी माझ्या बदनामीचा खटला दाखल करणार असून, ज्या नेत्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे. आवश्यक ती सर्व कायदेशीर कारवाई करणार आहे.”