अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बतावणी करून वृध्द महिलेकडील दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण व एक तोळ्याचे कानातील सोन्याचे वेल असा सुमारे 75 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. शुक्रवारी (22 नोव्हेंबर) सकाळी तपोवन रस्ता परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला साहेबराव शिंदे (वय 59 रा. महाराष्ट्र बँकेच्या पाठीमागे, तपोवन रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा मुलगा सोमनाथ 20 एप्रिल 2024 रोजी मयत झाला आहे. फिर्यादी शुक्रवारी सकाळी 10 वाजता घरी असताना त्यांच्याकडे एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आला.
तुमचा मुलगा सोमनाथ याचा मित्र राशीनकर (पूर्ण नाव नाही) असल्याचे त्याने फिर्यादीला सांगितले. त्यानंतर त्याने तुमच्या मुलाचे पैसे आलेले आहेत, त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या सोन्याची पावती द्यावी लागेल. तेव्हा फिर्यादीने त्याला सोन्याची पावती नसल्याचे सांगितले. माझ्या ओळखीच्या सोनाराकडून सोन्याची पावती तयार करून घेऊ, असे त्याने सांगितल्याने फिर्यादी त्याच्यासोबत दुचाकीवर बसून गेल्या. त्याने दुचाकी तपोवन रस्त्यावरील गुंड्डू गोडाऊन समोर थांबवली व फिर्यादीला दुचाकीच्या खाली उतरून दिले.
तुम्ही येथेच थांबा व तुमच्याकडील सोने मला द्या, मी त्याची पावती तयार करून देतो असे सांगितल्याने फिर्यादीने त्यांच्याकडील सुमारे तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने त्याच्याकडे काढून दिले. तो दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या दिशेने निघून गेला. फिर्यादी यांनी त्याची वाट पाहिली असता तो परत आला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.