नाशिक। प्रतिनिधी Nashik
जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी ९२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेचे अॅॅडमीन मॅनेजर जयेश के. गुजराथी (३४, रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी शनिवारी (दि.४) मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान ही घरफोडी केली. चोरटे फायनान्स कंपनीच्या प्रादेशिक व्यवस्थापकांच्या दालनाच्या खिडकीतून आत शिरले. लॉकरमध्ये २२२ ग्राहकांचे १३ किलो ३८५.५३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने होते. हे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.
बँकेच्या सीसीटीव्हीत दोन चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. गोल्ड लोन सर्व्हिस असोसिएट किरण जाधव हे शनिवारी (दि.४) सायंकाळी सहाच्या सुमारास ग्राहकाचे दागिने सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यास गेले. त्यांनी लॉकर उघडले असता लॉकर रिकामे असल्याचे दिसले. लॉकरमधील दागिने आढळून न आल्याने अधिकाऱ्यांनी बँकेतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र कोणीही माहिती दिली नाही. त्यामुळे बँकेतील तीन सीसीटीव्ही तपासले असता मध्यरात्री दोन चोरट्यांच्या हालचाली आढळून आल्या. चोरट्यांनी चेहरा झाकलेला होता. चोरीची घटना सीसीटीव्हीत दिसत असून त्याआधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे
चोरटे माहितीगार
कंपनीतील सेफ्टी लॉकर उघडण्यासाठी दोन चाव्यांचा वापर एकत्रितपणे करावा लागतो. त्याशिवाय लॉकर उघडत नाही. दोन्ही चाव्या कंपनीच्या दोन वरिष्ठांच्या ताब्यात असतात. चोरट्यांनी दोन्ही चाव्या कंपनीच्या कार्यालयातून घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे कंपनीत शिरण्याचा मार्ग व चाव्या कोठे असतात याची माहिती कंपनीतील व्यक्तींना माहिती असल्याने ही घरफोडी कंपनीतीलच माहितगारांनी केल्याचा संशय पोलिसांना आहे. चोरटे २५ ते ३० वयोगटातील असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी चेहऱ्यावर रुमाल लावून चाेरी यशस्वी केली.