मुंबई | Mumbai
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरूवात झाली आहे. या अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आज हातात बेड्या घालून अधिवेशनाला पोहोचले. मीडियाशी बोलताना त्यांनी आपण या बेड्या का घातल्या? त्यामागच स्पष्टीकरण दिले. “महाराष्ट्रात, भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडले जातेय त्यासाठी हातात बेड्या घातल्या” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून का आलेत असा प्रश्न सर्वांना पडला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय. जे कार्यकर्ते व्यक्त होतायेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आवाज बंद केले जातायेत. ही पद्धत चुकीची आहे. आम्हाला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. हे मुलभूत अधिकार असताना ते शाबीत राहिले पाहिजेत त्यासाठी या बेड्या घालून निषेध केला जात आहे असे त्यांनी सांगितले.
“अमेरिकेत भारतीयांवर अन्याय होत आहे. व्हिसाच्या बाबत ट्रम्प सरकारने आखलेले धोरण अनेकांचे घर-संसार उद्ध्वस्त करणारे आहे. भारतीयांना विमानातून कोंबून देशात पाठवण्यात आले. पायात साखळदंड, हातात हातकड्या, हा प्रकार भारतीयांना हिणवणारा आणि अपमानीत करणार होता. अमेरिकेत जाऊन मोठे होणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न उद्ध्वस्त होताना दिसत आहे. बेड्यांविरुद्ध भारतीय बोलत नसू, अमेरिकेच्या अन्यायाविरुद्ध व्यक्त नाही झाल्यावर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नका. अमेरिकेविरुद्ध आवाज उठवा. अमेरिका आपला बाप नाही,” असे आव्हाड यांनी ठणकावून सांगितले.
याच बेड्या धनंजय मुंडेंना घातल्या जाव्यात का? त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “ते सरकारच्या मनावर आहे. मला वाटत नाही सरकार असे करेल. त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगत आहे. गांधी हत्या नथुरामने केली पण विचार कोणाचे होते? हा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी विचारलेला. वाल्मिक कराडवर हत्येचा आरोप सिद्ध झालाय. आम्ही ओरडून सांगत होतो. सरकार ऐकायला तयार नव्हते. सीआयडीने आता समोर आणलय. तो खास माणूस आहे कोण म्हणालेले? मग नैतिकता आहे की नाही? तुमचा खास माणूस इतका निदर्यी, क्रूर असेल मग काय करायचे?”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा