Wednesday, October 16, 2024
Homeदेश विदेशJammu-Kashmir Elections : भाजपा प्रदेशाध्यक्षांचा पराभव केलेल्या नेत्याची जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी; कोण...

Jammu-Kashmir Elections : भाजपा प्रदेशाध्यक्षांचा पराभव केलेल्या नेत्याची जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी; कोण आहे सुरिंदर चौधरी?

जम्मु-काश्मिरच्या मुख्यमंत्रीपदाची ओमर अब्दुल्लांनी घेतली शपथ

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आज (१६ ऑक्टोबर) जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले. श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. त्यांच्याशिवाय इतर पाच आमदारांनीदेखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे, या पाच मंत्र्यांच्या यादीत जम्मू प्रदेशातील दोन हिंदू मंत्र्यांचा समावेश आहे.

या शपथविधी समारंभासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, आप नेते संजय सिंह यांच्यासह ६ पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, उद्धव ठाकरे, शरद पवार, लालू प्रसाद यादव आणि अरविंद केजरीवाल यांच्यासह सुमारे ५० व्हीआयपींना निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.

- Advertisement -

कोण आहे सुरिंदर चौधरी
या शपथविधी समारंभात एक असे नाव समोर आले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ओमर सरकारमध्ये सुरिंदर चौधरी यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. सुरिंदर चौधरी यांना उपमुख्यमंत्री बनवून ओमर अब्दुल्ला यांनी राज्यात हिंदुंमध्ये आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. सुरिंदर चौधरी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा दारूण पराभव केला आहे.

मागील वर्षी जुलैमध्ये सुरिंदर चौधरी यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रवेश केला होता. त्याआधी ते पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीत(पीडीपी) होते. त्यानंतर पीडीपीमधून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या आधी नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रवेश केला होता.

चौधरी यांनी रवींद्र रैना यांचा ७,८१९ मतांनी पराभव केला. या विजयासह, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हे जम्मू-काश्मीरच्या राजकारणात एक हेविवेट नेते म्हणून उदयास आले आहेत. ही जागा राजौरी जिल्ह्याचा भाग असून राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सुरिंदर चौधरी हे मुळात उद्योगपती आहेत, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून त्यांना पुढे केले आहे.

सुरिंदर सिंग चौधरी यांना उपमुख्यमंत्री बनवून नॅशनल कॉन्फरन्सने हिंदू मतदारांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. काश्मीर खोऱ्यातून हिंदूंच्या पलायनानंतर नॅशनल कॉन्फरन्सची हिंदू मतांवरील पकड कमकुवत झाली आहे. २०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपच्या मजबूत उदयापूर्वी काँग्रेस आणि पँथर्स पक्षासारख्या पक्षांचा प्रभाव होता. फक्त, जम्मू प्रदेशातील राजौरी, पूंछ, डोडा, किश्तवाड आणि रामबन, मुस्लिमबहुल मतदारसंघातच नॅशनल कॉन्फरन्सचा प्रभाव होता. पण, आता नॅशनल कॉन्फरन्सने ओमर मंत्रिमंडळात जम्मू विभागातील दोन मंत्र्यांना स्थान दिले असून सुरिंदर चौधरी यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या