संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून एका विवाहीतेला नाशिकहून संगमनेरला बोलावून घेतले. तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत संगमनेर बस स्थानकासमोर तिला अपमानास्पद वागणूक दिली. याप्रकरणी लोणीच्या किरण किसन आहेर याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक परिसरात राहणार्या एका विवाहितेशी व्हॉटस्अॅप वरून ओळख वाढवून सदर विवाहितेला माझे शिर्डी येथे शाळा, कॉलेज आहे तेथे तुला नोकरी लावून देतो. किंवा संगमनेर येथे हॉस्पिटलमध्ये नोकरीला लावून देतो, तू संगमनेरला ये, असे आमिष दाखविले. परिस्थितीमुळे सदर विवाहीता संगमनेरात आली. संगमनेर बसस्थानकावर ती थांबली असता तेथे किरण आहेर हा आला. त्याने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असभ्य वर्तन करायला सुरुवात केली.
तू माझ्या गाडीमध्ये बस असे म्हणाल्यावर सदर विवाहितेने नकार दिला. त्यावेळी तो म्हणाला, मला तू खुप आवडतेस, आपण एखाद्या हॉटेलवर जाऊ, तू इतकी छान दिसते की तुला जॉब करण्याची गरज नाही. मी तुला पैसे देईन फक्त मी जेव्हा बोलावेल तेव्हा संगमनेरला येत जा, नाही तर मी नाशिकला येत जाईल, त्यानंतर किरण याने सदर विवाहितेचे मोबाईलवर फोटो काढले. त्यावेळी सदर विवाहीतेला राग आला. त्याने लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यावेळेस विवाहितेची व त्याची झटापट झाली. त्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशी व लोकांच्या ही बाब लक्षात आली. तोपर्यंत सदर विवाहितेने 112 नंबरला फोन करून पोलिसांना कळविले. प्रवाशी व नागरिकांनी विवाहितेची सुटका केली. दरम्यान पोलीस दाखल झाले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
याबाबत सदर विवाहितेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार किरण आहेर याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 354 अ, 354 ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.