सात जणांविरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी) – शिक्षण संस्थेत नोकरी लावून देतो असे सांगत सहा लाख रुपये घेऊन फसवणूक करणार्या संस्थाचालकांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हरेश्वर सारंधर साळवे यांनी फिर्याद दिली.
सदगुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, अनिता सुभाष साळवे, संजय बन्सी साळवे, रेखा सुजय साळवे (रा. विजयनगर, भिंगार), अनिल तुळशीदास शिंदे, मंगल अनिल शिंदे (रा. इंदिरानगर, श्रीरामपूर), राजू बन्सी साळवे (रा. डोंबिवली खांदगाव ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
हरेश्वर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, सुभाष साळवे व इतरांनी श्रीसद्गुरू रोहिदास ग्रामिण प्रतिष्ठान भिंगार येथे कला शिक्षक या पदावर नियुक्ती करून देतो असे सांगितले होते. संस्थाचालक व इतरांनी मुलाखती घेत फिर्यादीकडून सहा लाख रुपये घेत शासनाची आर्डर मिळणार असल्याचे सांगितले. त्यानंतर 15 जून 2019 रोजी हजर झाले. वारंवार पगाराची मागणी केली असता संस्थाचालकांनी उडवाउडवीची उत्तरे देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.