Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखसंयुक्त जबाबदारी

संयुक्त जबाबदारी

राज्याच्या अनेक गावखेडे आणि अती दुर्गम गावांमध्ये लालपरी अर्थात एसटीचे अजूनही अप्रूप टिकून आहे. जिथे गाव किंवा रस्ता तिथे एसटी असे म्हंटले जाते. बीडच्या धारूर तालुक्यात काळ्याची वाडी आणि मांजरकडा या गावांमध्ये एसटी नुकतीच पहिल्यांदा पोहोचली. ग्रामस्थांनी पहिल्या बसगाडीचे जोरदार स्वागत केले. एसटी महामंडळ तोट्यात असून करोनाच्या काळात त्यात वाढ आल्याचे सांगितले जाते. एसटी कामगारांचा संपही राज्यात गाजला. लोकसंख्येच्या प्रमाणात एसटी बसची संख्या वाढली नाही.  एसटी महामंडळाच्या बससेवेला अनेक पर्याय निर्माण झाले. वाढत्या स्पर्धेला सामोरे जावे लागले. लागत आहे. काळानुसार बदल करणे आवश्यक आहे. एसटी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यानाही त्याची जाणीव असावी. महामंडळाकडून विविध निर्णय जाहीर केले जात आहेत. महिलांना बसभाड्यात ५० टक्के सवलत हा त्यापैकी एक निर्णय. राज्य सरकारने स्वच्छ व सुंदर बसस्थानक स्पर्धा जाहीर केली आहे. ज्यात बसस्थानक, स्वच्छतागृहे, स्थानक परिसर स्वच्छ व टापटीप ठेवणे अपेक्षित आहे. दर दोन महिन्यांनी प्रत्येक एसटी बसस्थानकांचे स्पर्धात्मक परीक्षण होईल.  राज्य ज्यात ५८० एसटी बसस्थानके आहेत. बस स्थानके आणि बसमधील स्वच्छता ही गंभीर समस्या आहे. प्रवाशांची देखील हीच तक्रार आढळते. स्थानक परिसरात उग्र गंधाला नेहमीच सामोरे जावे लागते असे प्रवाशी सांगतात. अनेकदा प्रवाशांना बसची काही तास प्रतीक्षा करावी लागते. रात्रीचा मुक्काम स्थानकात करण्याची वेळ काही प्रवाशांवर येते. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे की अस्वच्छतागृहे असा प्रश्न प्रवासी विचारतात. हीच परिस्थिती बदलणे हा अर्धेचा मुख्य उद्देश असावा. स्पर्धेत दोन कोटींची पारितोषिके दिली जाणार आहेत. मिळालेल्या पारितोषिकाचा काही हिस्सा कर्मचाऱ्यांमध्ये वाटला जाईल असे सरकारने जाहीर केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळू शकेल. एसटी माझी आहे ही भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ शकेल. ही भावना प्रेरणापूरक ठरेल. स्थानके आणि एसटीगाड्या स्वच्छ ठेवण्यात लोकसहभागही तितकाच महत्वाचा ठरू शकेल. एसटीस्थानक आणि बस अस्वच्छ कोण करते या प्रश्नातच सामाजिक जबाबदारीचे भान दडले आहे. सार्वजनिक मालमत्तेच्या मालकी भावनेचा अभाव समाजात आढळतो. त्याला एसटीही अपवाद नाही. स्थानके आणि गाड्या अस्वच्छ होण्याला अनेक प्रवाशांचे बेजबाबदार वर्तन एक कारण ठरते. लोक वाट्टेल तिथे थुंकतात. कचरा करतात. खाऊची रिकामी पाकिटे जिथे खातील तिथेच टाकून जातात. स्वच्छतागृहाचा योग्य वापर करत नाहीत. नियम पाळत नाहीत. स्थानके आणि बसगाड्या स्वच्छ राखणे सरकारचे कर्तव्य आहे. तथापि स्वच्छता कायम राखणे ही लोकांची देखील जबाबदारी आहे. सरकारी स्पर्धेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळेल आणि स्थानके स्वच्छ होतीलही. पण ती तशीच राखण्यात प्रवाशांचीही मोलाची भूमिका आहे. स्थानके आणि गाड्या स्वच्छ हव्या असतील तर त्या तशा राखल्या जायला हव्यात. याचे भान प्रवाशांना कधी येईल? एक बोट दाखवून तक्रर करताना हाताची उर्वरित बोटे स्वतःकडे रोखली जातात याचा विसर पडून चालेल का? 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या