Tuesday, September 17, 2024
Homeनाशिकमालेगावला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटास धक्का

मालेगावला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटास धक्का

माजी आमदार आसिफ शेख यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार

- Advertisement -

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मालेगाव मध्य मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटास ती सुटणे अशक्य असल्याने आपण विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवावी असा निर्णय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने घेतला आहे. यामुळे आपल्यासह सर्व पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असून या संदर्भात प्रदेशाध्यक्षांना पत्राव्दारे माहिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढणार असल्याचे माजी आमदार आसिफ शेख यांनी येथे बोलतांना स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती यांच्या विरोधात माजी आमदार आसिफ शेख, काँग्रेस महानगरप्रमुख एजाज बेग, समाजवादी पार्टीच्या शानेहिंद निहाल अहमद यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याच्या दृष्टीकोनातून सभा व बैठका घेण्यास प्रारंभ केला आहे. मध्य मतदार संघाची जागा काँग्रेसची पारंपारिक असल्याने ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटास सोडण्याची शक्यता नाही. निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत माजी आमदार आसिफ शेख यांनी सभा व बैठकांचा धडाका उडवून दिला आहे.

पक्षाकडून उमेदवारीचा एैनवेळी दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अपक्ष उमेदवारी करावी अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे सातत्याने केली जात होती. निवडणूक रिंगणात उतरणार्‍या पक्षीय उमेदवारांचे राजकीय समीकरण लक्षात घेत अपक्ष निवडणूक लढविणे सोपे ठरणार असल्यामुळेच आसिफ शेख राष्ट्रवादीस सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा शहरात रंगली होती. आज झालेल्या बैठकीत या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले.

येथील हजारखोली भागातील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज माजी आमदार आसिफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस कार्याध्यक्ष एजाज अहमद मो. उमर, शकील अहमद, शाहीद अहमद रेशनवाला, युवक अध्यक्ष शेख अक्रम, युवक कार्याध्यक्ष आसिम अहमद अन्सारी, महिला आघाडी अध्यक्षा यास्मीन सैय्यद, सेवादल अध्यक्ष रियाज अली, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष नदीम अहमद फनीवाला, कार्याध्यक्ष मनमोहन शेवाळे, शफिक बॉक्सर, एकलाख शाह, अर्बन सेल अध्यक्ष शाहीद काजी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीनुसार कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी या संदर्भात पदाधिकार्‍यांमध्ये सखोल चर्चा केली गेली. मध्य मतदार संघाची पारंपारिक जागा काँग्रेस लढविणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. जागा अदलाबदलीत ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास मिळण्याची शक्यता धुसर आहे. पक्षाकडून उमेदवारीचा ऐनवेळी होणारा दगाफटका टाळण्यासाठी तसेच निवडणुकीस अवघ्या दोन-तीन महिन्यांचा अवधी शिल्लक असल्याने आजच योग्य तो निर्णय घेण्याचे निश्चित करत आसिफ शेख यांनी अपक्ष उमेदवारी करावी अशी सुचना पदाधिकार्‍यांनी केली असता त्यावर एकमताने बैठकीत शिक्कामोर्तब केले गेले.

विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा आसिफ शेख यांनी बैठकीत करताच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. अपक्ष उमेदवारी करणार असल्याने आपल्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घेतलेल्या निर्णयाची माहिती पत्राव्दारे देण्यात आली असल्याचे आसिफ शेख यांनी स्पष्ट केले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या