संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील दळणवळणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या म्हणून ओळखल्या जाणार्या आणि दोन गावांना जोडणार्या जोर्वे ते पिंपरणे या प्रवरा नदीवरील पुलाच्या कडेला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जोर्वे ते पिंपरणे या दोन गावांच्यामधून प्रवरा नदी वाहत आहे. याच नदीवर हा पूल आहे. पुलावरून कनोली, ओझर, शेडगाव आदी गावांमधील नागरिकांसह छोट्या- मोठ्या वाहनांचीही नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जात आहे.गेल्या वर्षी याच पुलाचे संरक्षक कठडे तोडून मालवाहू गाडी खाली कोसळली होती. त्यामध्ये दोघा जणांना आपले जीवही गमवावे लागले होते. असे असतानाही अद्यापही तुटलेल्या संरक्षक कठड्याच्या जागी दुसरे कठडे बसविण्यात आले नाही.त्यातच आता पुलाच्या कडेला मोठे भगदाड पडले आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती समजताच त्यांनी शनिवार ता. 29 जुलै रोजी सकाळी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून पुलाच्या पायाजवळ वाळूचा भराव केला आहे. त्यानंतर पडलेल्या खड्ड्यात तात्पुरत्या स्वरूपात विटांचा भराव केला आहे. दरम्यान प्रवरा नदीला पाणी आल्यानंतर पायाजवळ केलेला भराव वाहून जाणार आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याठिकाणी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.
याच ठिकाणी झाला होता दोघांचा मृत्यू
जोर्वे- पिंपरणे या दोन गावांना जोडणार्या प्रवरा नदीवरील पुलाच्या कडेला मोठे भगदाड पडले आहे. मागील वर्षी याच पुलावर दुर्दैवी घटना घडली होती. ती पुन्हा घडू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.