मुंबई | Mumbai
मतदार यादीतील गंभीर त्रुटींवरून महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने सलग दुसऱ्या दिवशीही निवडणूक आयोगासोबत चर्चा केली. मंगळवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत आयोगाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने, शिष्टमंडळाने आज, बुधवारी (१५ ऑक्टोबर), पुन्हा राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर थेट ‘कटपुतली बाहुले’ असल्याचा गंभीर आरोप केला.
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “लोकशाहीच्या आणि तिच्या रक्षणासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. हा विषय गेल्या विधानसभा निवडणुकीपासून आमच्या लक्षात येत आहे. आज आम्हाला त्यांच्याशी (आयोग अधिकाऱ्यांशी) बोलताना हे स्पष्ट झाले की, ते निवडणूक अधिकारी नव्हेत, तर ‘कटपुतली बाहुले’ आहेत.” ठाकरे पुढे म्हणाले की, “त्यांना वरून कोणीतरी आदेश देते आणि हे लोकशाहीचा खेळखंडोबा करत आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या मुद्द्यांवर योग्य उत्तरे मिळाली नाहीत.”
मतदार याद्यांमध्ये घोळ घालून लोकशाहीचा खेळखंडोबा सुरू असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. “मतदार यांद्यांमध्ये घोळ होता कामा नये. सत्ताधाऱ्यांच्या चोरवाटा आम्ही रोखल्या आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे यांनी मागणी केली की, जर आयोगाने लोकशाहीच्या नावाने हुकूमशाही गाजवायची ठरवली असेल, तर त्यांनी थेट “निवडणुकीऐवजी ‘सिलेक्शन’ करून मोकळे व्हावे.”
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांवर उद्धव ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्ही दोन्ही आयुक्तांना भेटलो. केंद्राचे प्रतिनिधी सांगतात, हा विषय राज्य निवडणूक आयोगाकडे येतो. तर राज्य आयुक्त म्हणतात, मतदार याद्यांचा विषय केंद्राकडे येतो. मग याचा बाप कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. निवडणूक आयोगाने काल घाईघाईत निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याबद्दल त्यांनी विरोध दर्शवला. “दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणूक नको,” अशी भूमिका घेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवल्याचेही सांगितले.
मतदार यादीतील घोळ दूर होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मुख्य मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. त्यांनी एक सूचक प्रश्नही उपस्थित केला. “जसा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो, तसा या सदोष मतदानाच्या (मतदार यादीतील घोळाच्या) प्रकरणावरून सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का?” असा सवाल त्यांनी विचारला. भाजपने शिष्टमंडळात न येण्यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले, तसेच भाजपचे काही कार्यकर्ते मतदार याद्यांशी खेळत असल्याची तक्रार आपण महिनाभरापूर्वीच पत्राद्वारे केली होती, असेही त्यांनी नमूद केले.




