दिल्ली । Delhi
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज सकाळी १० वाजता राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमुर्ती संजीव खन्ना यांना शपथ दिली. संजीव खन्ना पुढील सहा महिने या पदावर कार्यरत राहतील.
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड १० नोव्हेंबर रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांनी शपथ घेतली.
न्यायमुर्ती संजीव खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला असून, दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. त्यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे (NALSA) कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यानंतर पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावाची चर्चा आहे. ते मे २०२५ मध्ये पदभार स्वीकारू शकतात. भूषण रामकृष्ण गवई सरन्यायाधीश झाल्यास ते दुसरे मागासवर्गीय सरन्यायाधीश ठरतील. तेही सरन्यायाधीश म्हणून सहा महिने पदावर राहतील. त्यांच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे.