मुंबई | Mumbai
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीला आमदारकी देण्याची मागणी केली जात आहे.
त्यापार्श्वभुमीवर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार बनवण्याची मागणी केली आहे. शिवसंग्राम टिकवण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी ज्योती मेटेंना आमदारकी द्यावी, असे संभाजीराजे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संभाजीराजेंनी ही मागणी केली आहे.
१४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटेंचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.